सातारा - कोरोना काळात लोकांच्या मनातील भीती व आगतिकतेचा फायदा उठवत लोकांना जादा शुल्कासाठी काही उपचार केंद्रांवर अडवले जात असल्याच्या तक्रारी आहेत. अनाठायी भीती व भावनेपोटी लोक तक्रार करायला पुढे येत नाहीत. त्यामुळे लोकांची होणारी आर्थिक लूट थांबविण्यासाठी जिल्हास्तरावर तपास यंत्रणा असावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मालप्रॅक्टिसला वाव
'कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात बऱ्याच वैद्यकीय व्यवसायिकांनी विविध प्रकारच्या चाचण्यांवर भर दिला आहे. एवढ्यावरच न थांबता सिटीस्कॅनसारख्या महागड्या चाचणीनंतर चाचणी, अशा विशिष्ट दिवसांच्या फरकाने दुबार, तिबार चाचण्या करायला सांगितल्याच्या तक्रारी काही रुग्णांच्या ऐकायला मिळतात. खरंतर गरज नसतानाही निदान चाचणी करायला लावली जाते, इथंच मालप्रॅक्टिस सुरू होते', असे डॉ. प्रताप गोळे यांनी म्हटले आहे.
'वैद्यकीय व्यवसायिकांनी बंधन पाळावे'
'एखादी व्यक्ती गृहविलगीकरण अथवा संस्थात्मक विलगीकरणात असल्यास त्याच्या कोणकोणत्या टेस्ट किती वेळा कराव्यात? याच्यावर डॉक्टर म्हणून स्वतः बंधन घालून घेणे गरजेचे आहे. आपण पुनपुन्हा त्याच त्याच तपासण्या करत असताना उपचार बदलणार नसू तर त्या तपासणीसह त्या रुग्णाला काय उपयोग होणार आहे, याचा पुनर्विचार करणे गरजेचे आहे. सौम्य आजाराच्या रुग्णांवर सीआरपी, ईएसआर, एलडीएच, डी डायमर अशा भरमसाठ चाचण्यांचा मारा त्यांचा आर्थिक भार वाढवणारा आहे. सिटीस्कॅनमुळे रुग्णावर 300 एक्स-रेचा मारा होतो. अशी चाचणी खरोखरच रुग्णांसाठी गरजेची आहे का? याचा सारासार विचार वैद्यकीय तज्ज्ञांनी करावा', अशी विनंती साताऱ्यातील प्रथितयश तज्ज्ञ डॉ. प्रताप गोळे यांनी केली.
'दर्शनी भागात दरपत्रकच नाही'
'अशा चाचण्यांचे दरपत्रक दर्शनी भागात लावण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. सातारा शहरांमध्ये अनेक ठिकाणी याचे पालन केले जात नाही, अशी तक्रार सातारा कोविड डिफेंडर ग्रुपचे बिनीचे कार्यकर्ते विनीत पाटील यांनी केली. स्लाईस मशीनच्या हिशेबाने सिटीस्कॅन करण्यासाठी शासनाने अडीच हजार रुपये दर निश्चित केला आहे. त्यात एका डायग्नोस्टिक सेंटरने तब्बल 4 हजार रुपये इतके अतिरिक्त चार्जेस घेतले गेले', असे विनीत पाटील यांनी सांगितले.
'रात्रीचे कारण सांगून उकळतात पैसे'
'एका रुग्णाला तर मी घेतले गेलेले ओव्हर चार्जेस परत मिळवून दिले. त्या केसमध्ये तब्बल 5 हजार रुपये घेतले गेले होते. ग्रामीण भागातील रुग्णांचे नातेवाईक तक्रार करायला पुढे येत नाहीत. मात्र रात्रीची वेळ असल्याचे कारण सांगून काही डायग्नोस्टिक सेंटरवर चार्जेस घेतले', असे विनीत पाटील यांनी सांगितले.
'तपासणीसाठी यंत्रणा असावी'
'हॉस्पिटलचे दरपत्रक तपासण्यासाठी ऑडिटरची नेमणूक सातारा जिल्हाधिकारी यांनी केली आहे. प्रशासनाने या पद्धतीची नेमणूक डायग्नोस्टिक सेंटरचे आर्थिक व्यवहार तपासण्यासाठी करावी. दरपत्रक डायग्नोस्टिक सेंटरमध्ये दर्शनी भागात लावले जाते का? त्याप्रमाणे चार्जेस आकारले जातात का? याची तपासणी झाली पाहिजे', अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मोदी यांनी व्यक्त केली. तर, रुग्णांच्या आर्थिक लुटीसंदर्भात साताऱ्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी 'गेल्या वर्षभरात आपल्याकडे अवाजवी शुल्क आकारणीबाबत एकही तक्रार आली नाही' असे सांगितले.
हेही वाचा - Magnet Man नाशिकच्या या व्यक्तीच्या शरीराला चिकटतात लोखंडी वस्तू, लस घेतल्यानंतर सुरू झाला प्रकार