सातारा - नीरा-देवघर धरणाचे पाणी माढा, सांगोला, फलटण या भागाला सोडण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून या प्रश्नावर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांनी आवाज उठवला होता. लोकसभा निवडणुकीत देखील हा मुद्दा महत्त्वाचा ठरला होता. खासदार निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांनी आज या धरणावर जाऊन येथील पाणी माढा लोकसभा मतदारसंघातील वंचित गावांकडे वळवले आहे.
नीरा-देवघरच्या पाणी प्रश्नाबाबत आज जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, सातारचे पालकमंत्री विजय शिवतारे यांची खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माण- खटावचे काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांनी भेट घेतली होती. त्यानंतर झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेत पाणी माढा, सांगोला भागाकडे उजव्या कालव्यातून सोडण्यात आले आहे.
दुष्काळी भागात सांगोला, माळशिरस, पंढरपूर, फलटणचा काही भाग समाविष्ट होतो. नीरा देवधरचे पाणी वाटप करताना 1954 साली पुणे, बारामती पाणी घेत असलेल्या डाव्या कालव्यातून 43 टक्के तर सांगोला, फलटण, माळशिरस आणि पंढरपूर पाणी घेत असलेला उजव्या कालव्यातील 57 टक्के पाणी देण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर 2009 मध्ये अजित पवार जलसंपदा मंत्री झाल्यावर त्यांनी करार बदलला. त्यांनी दुष्काळी भागातील उजव्या कालव्याचे पाणी बारामतीकडे डाव्या कालव्यात वळवले होते.
त्यामुळे डाव्या कालव्यातील पाणी दुष्काळी भागात जाण्यासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांनी ताकद पणाला लावली होती. त्याला आज यश आले आहे.
- पाणीवाटप करार
- डावा कालवा बारामती व पुणे 43 टक्के
- उजवा कालवा सांगोला, माळशिरस, माढा 57 टक्के