सातारा: अजित पवार म्हणाले की, आम्ही एखाद्या कार्यक्रमाला गेलो की लोक आमच्याबरोबर फोटो काढतात. त्यांना नाही पण म्हणू शकत नाही. अदानींना तर मी पहिल्यापासून ओळखतो. अदानींच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने जेपीसी नेमण्याचा आदेश दिलेला आहे. समिती नेमल्यानंतर त्यांच्या संदर्भातील वस्तुस्थिती समोर येईल. त्यामुळे लगेगच कुणाला तरी आरोपीच्या पिंजर्यात उभे करणे योग्य नाही.
मविआत फूट पडण्याचा काय संबंध? जेपीसी (संयुक्त संसदीय समिती) वरून महाविकास आघाडीत फूट पडण्याचा काय संबंध? असा सवाल करत अजित पवार म्हणाले की सोनिया गांधी, शरद पवार आणि उध्दव ठाकरे हे तिघे महाविकास आघाडीच्या पाठिशी आहेत, तोपर्यंत महाविकास आघाडीला काहीही होणार नाही.
स्टँपवर लिहून देऊ का? राष्ट्रवादीत सर्व आलबेल आहे का? या प्रश्नावर अजित पवार वैतागून म्हणाले, स्टँप देता का मला? आता काय स्टँपवर लिहून देऊ का? मी कितीवेळा सांगितले की, मला कधी-कधी पित्ताचा त्रास होतो. माझे जागरण आणि दौरे सुरू आहेत. एकदा खुलासा करून देखील तोच तोच प्रश्न विचारलेला मला आवडत नाही. महत्त्वाचे प्रश्न सोडून तुम्ही कोण फडतूस म्हणतेय, कुणी काडसूत म्हणतेय हेच दाखवता, अशा शब्दांत पवारांनी माध्यमांना सुनावले.
अंगाला भोके पडत नाहीत: काँग्रेस प्रवक्त्या अलका लांबा यांनी शरद पवारांबद्दल केलेल्या टीकेसंदर्भातील प्रश्नावर अजित पवार संतापले. कोणी आम्हाला काही म्हटले, निशाना साधला तरी आमच्या अंगाला भोके पडत नाहीत. रोज कोणीतरी ट्विट करत बसेल. आम्ही कोणाच्याही प्रश्नाला उत्तर देण्यासाठी बांधील नाही. आम्हाला तेवढेच काम नाही. जे महत्त्वाचे व्यक्ती आहेत, त्यांच्या प्रश्नाला उत्तर देणे आमचे काम आहे, असे स्पष्टिकरण पवारांनी दिले.
म्हणून उध्दव ठाकरेंना वेगळी खुर्ची: छत्रपती संभाजीनगरमधील सभेत उध्दव ठाकरेंसाठी वेगळी खुर्ची ठेवल्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. त्यासंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले, उध्दव ठाकरे यांना मणक्याचा त्रास होता. त्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे त्यांना ताठ खुर्चीवर बसावे लागते. म्हणूनच त्यांच्यासाठी वेगळी खुर्ची ठेवली होती, असा खुलासा अजित पवारांनी केला.