सातारा - प्रतिष्ठेची ठरलेल्या कुडाळ जिल्हा परिषद गटातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक पवार यांचा दणदणीत विजय झाला. त्यांनी भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार मालोजी शिंदे यांचा पराभव केला. या निवडणुकीमध्ये आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अखेर यामध्ये शशिकांत शिंदेंनी बाजी मारली.
कुडाळ जिल्हा परिषद गटातील तत्कालीन सदस्य दीपक पवार यांनी सातारा-जावली विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांचा पराभव केला. विधानसभा निवडणुकीनंतर रिक्त झालेल्या पदाबाबत काही दिवसातच कुडाळ जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे दीपक पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तर भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार मालोजी शिंदे यांनी अर्ज भरला होता. यामध्ये दीपक पवार यांनी मालोजी शिंदे यांचा 5 हजार 488 मतांनी पराभव केली.
माजी आमदार शशिकांत शिंदेंसह सातारा-जावलीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. सुमारे 6 अपक्ष उमेदवारांनी आपले निवडणूक अर्ज माघारी घेतल्यानंतर दीपक पवार यांच्याविरुद्ध मालोजी शिंदे असा सामना झाला. काल दि. 12 रोजी झालेल्या मतदानादिवशी 44 टक्के मतदान झाले. 26 मतदान केंद्रांवर 33 हजार 56 मतदारांपैकी 14 हजार 551 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.
सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या दीपक पवार यांनी प्रथमपासूनच आघाडी घेतली होती. अखेर सकाळी 11 वाजता निकालाचे चित्र स्पष्ट झाले. राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक पवार यांना 9 हजार 923, तर अपक्ष उमेदवार मालोजी शिंदे यांना 4 हजार 434 मते पडली. राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक पवार हे तब्बल 5 हजार 488 मतांनी विजयी झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून साताऱ्याच्या प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी काम पाहिले.
प्रतिष्ठेच्या निवडणुकीत आमदार शिवेंद्रराजेंवर शशिकांत शिंदेंचा विजय
राज्यात अनपेक्षित सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. राष्ट्रवादीत असणार्या दोन्ही राजांनी विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच सीमोल्लंघन करीत भाजपत प्रवेश केला. त्यामुळे सातारा-जावळी तसेच कोरेगाव मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली. यामुळे माजी आमदार शशिकांत शिंदे यांचा अनपेक्षित पराभव झाला. मूळचे जावली तालुक्यातील असणार्या शशिकांत शिंदेंना हा पराभव जिव्हारी लागला. त्यामुळे शशिकांत शिंदेंनी कुडाळ जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली होती. तर अपक्ष उमेदवार मालोजी शिंदे यांच्या पाठिशी शिवेंद्रराजे भोसले यांनी ताकद लावली होती. परंतु, शिवेंद्रराजेंची ताकद शशिकांत शिंदे आणि दीपक पवार यांच्यासमोर तोकडी पडली. पर्यायाने दीपक पवार यांचा विजय झाला आहे. त्यामुळे आगामी काळात जावळी तालुक्यावर 'होल्ड' कोणाचा हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.