सातारा - सातारा लोकसभा मतदारसंघात श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले एक लाख २८ हजार ७५७ हजार इतक्या मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्यांच्याविरोधात असणारे शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना ४ लाख ५२ ४९८ हजार मते मिळाली आहेत. निकालानंतर नरेंद्र पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकार आणि सातारकरांचे आभार मानले.
नरेंद्र पाटील म्हणाले, देशात आणि महाराष्ट्रात सगळ्यात मोठी निवडणूक पार पडली. महाराष्ट्रात प्रथमच एकीचे वातावरण शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पाहायला मिळाले आहे. मी अण्णासाहेब पाटील विकास महामंडळात काम करत होतो. मला साताऱ्यात काम करण्याची संधी उद्धव ठाकरे यांनी दिली. वीस दिवसात आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. देशात निवडणुका घेत असताना महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याच्या विकासाबाबत चर्चा करण्यात आली. विकासापासून वंचित असलेला रोष साताऱ्यातील जनता कुठेतरी माझ्यासारख्या उमेदवाराला खुप प्रचंड मत देऊन व्यक्त करत होती. मी-मी म्हणणाऱ्या दिग्गजांची मताधिक्य मी कमी केली आहेत. निवडणुकीत जय-पराजय होत असतो. पण सातारकरांचा विजय झाला आहे. सातारकरांना हे पटले आहे, की दहा वर्षात काही विकास झाला नाही. माझ्या पराभवाचा मी कुणाला दोष देणार नाही. या निवडणुकीत मला पत्रकार व सातारकरांनी चांगले सहकार्य केले आहे. विकासापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांचे विषय सातत्याने हातात घेऊन आपण मोदी सरकारसोबत काम करणार आहोत, असे मत नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.