सातारा - गड किल्ल्यांबाबत आपण केलेल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचे स्पष्टीकरण छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिले आहे. निवडणुका आल्या की चारित्र्यहनन करणे किळसवाणे असून गड-किल्ल्यांवर डान्सबार उघडा, असे म्हणण्याचा विचार मनात येण्यापेक्षा मेलेले बरे, अशी भावनाही त्यांनी वाई येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
गड-किल्ले ही छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचे प्रतिक आहेत. त्यांचे संवर्धन व्हावे, असे माझे म्हणणे आहे. याबाबत राज्य शासनानेही नियोजन केले आहे. गड-किल्ल्यांबाबत मी जे वक्तव्य केलेच नाही त्याचे खापर माझ्यावर फोडण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. उदयनराजे पुढे म्हणाले, गड-किल्ले पुरातत्व विभागाच्या ताब्यात असून लोकांना किल्ल्यावर जाता यावे, राहण्याची व्यवस्था असावी, यासाठी याठिकाणी काही आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्य शासनाने जी भूमिका मांडली, त्या भूमिकेनुसार गड-किल्ल्यांच्या पायथ्याशी राहण्याची व्यवस्था असावी, गडावर जाण्यासाठी रोपवे असावे, असे माझे म्हणणे होते. मात्र, माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला आहे.
हेही वाचा - मतासाठी कायपण! उदयनराजे, कदम पोहोचले बांधावर
आपण काही दिवसांपूर्वी एका दैनिकाला मुलाखत दिली होती. त्यावेळी गड-किल्यांबाबत भूमिका मांडली होती. ऐतिहासिक वास्तूंची डागडुजी झाल्यास पर्यटन वाढीस चालना मिळून रोजगार निर्मिती होणार आहे. निवडणूक आली की माझ्या चारित्र्यहननाचा काही जणांकडून कट शिजवला जातो, असा आरोपही उदयनराजे भोसले यांनी केला आहे.