कराड (सातारा) - खुनी हल्ल्यातील गुन्ह्यात अटक असलेल्या संशयीत आरोपीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कराड शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. संशयीत आरोपी हा दोन दिवस पोलीस कोठडीत होता. त्यानंतर न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती. त्याची वैद्यकीय चाचणी केली असता त्याला कोरोनाची लागण झाल्याचे आज (16 एप्रिल) आलेल्या अहवालात स्पष्ट झाले आहे.
कराडमधील गजानन हौसिंग सोसायटीतील प्रेरणा व्यसनमुक्ती केंद्रात तो काम करत होता. पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून त्याने रविवारी (11 एप्रिल) रात्री साडे अकराच्या सुमारास व्यसनमुक्ती केंद्रातील एकाच्या गळ्यावर चाकूने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. याप्रकरणी कराड शहर पोलिसांनी त्याला अटक केली होती. न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडीही सुनावली होती.
पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. यावेळी संशयीत आरोपीची उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय तपासणी आणि कोरोना चाचणीही करण्यात आली होती. त्याच्या कोरोना चाचणीचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे संशयीत आरोपीच्या संपर्कातील पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. संशयीत आरोपी हा मूळचा घारेवाडी (ता. कराड) येथील रहिवासी आहे. आरोपी कोरोनाबाधित आढळून आल्याने त्याच्या संपर्कातील पोलिसांना कोरोना चाचणी करून घ्यावी लागणार आहे.