सातारा - आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या विवाहित पुरूषाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार सातार्यातील वहागाव (ता. कराड) येथे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. बरकत खुदबुद्दीन पटेल, असे खून झालेल्या पुरूषाचे नाव आहे. अनैतिक संबंधाला अडथळा ठरत असल्याने ही हत्या झाल्याचा संशय असून याप्रकरणी मृताच्या पत्नीसह एका तरूणाला तळबीड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, हत्या केल्यानंतर ओढ्याकाठच्या शिवारात दहा फूट खड्डा काढून पुरण्यात आलेला मृतदेह जेसीबीच्या साह्याने बाहेर काढण्यात आला आहे.
मृत तरूण आठ दिवसांपासून होता बेपत्ता - वहागाव (ता. कराड) येथे पुणे-बंगळुरू महामार्गाच्या पश्चिमेकडील झोपडपट्टीत राहणारा बरकत पटेल हा ट्रक चालक होता. त्यामुळे तो सातत्याने बाहेर असायचा. आठ दिवसांपूर्वी (शुक्रवार, दि. 28 मे) तो राहत्या घरातून बेपत्ता झाला. त्याच्या कुटूंबियांनी मित्र व नातेवाईकांकडे चौकशी केली. परंतु, त्याचा ठावठिकाणाला लागला नाही. त्यामुळे त्याची पत्नी शहनाज पटेल हिने पती बेपत्ता झाल्याची तक्रार बुधवारी (दि. 1 जून) तळबीड पोलीस ठाण्यात दिली होती.
खड्ड्यात पुरलेल्या स्थितीत आढळला मृतदेह - आठ दिवस शोधाशोध करुनही बरकतचा शोध न लागल्याने नातेवाईकांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री पाटील यांची भेट घेऊन बरकतचा घातपात झाला असून महामार्गाच्या पश्चिमेकडील शिवारात बरकतचा मृतदेह पुरला असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला. त्यानुसार पोलिसांनी ओढ्याकाठच्या शिवाराची पाहणी केली असता त्यांना काही संशयास्पद बाबी आढळल्या. जेसीबीच्या साह्याने त्या ठिकाणी उकरण्यात आले असता बरकत पटेल याचा मृतदेह दहा फूट खोल खड्ड्यात पुरलेल्या स्थितीत आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी वहागावातील एका तरूणासह मृताच्या पत्नीला देखील संशयीत म्हणून ताब्यात घेतले आहे. गुन्ह्यात पत्नीचा सहभाग आहे का, याबाबतचा तपास सुरू आहे.
हेही वाचा - Nawab Malik Office : मंत्री महोदय कोठडीत, कर्मचारी मात्र एसीत...कार्यालय बंद असतानाही लाखोंचा खर्च