सातारा - सरताळे (ता. जावळी) येथे ग्रामपंचायत शिपायाने दारूच्या नशेत गावच्या विहिरीत 'टीसीएल' पावडरचे आख्खे पोते ओतले. यामुळे पन्नासहून अधिक ग्रामस्थांना दूषित पाणी पिल्याने गॅस्ट्रो सदृश्य उलट्या, अतिसार आजाराची बाधा झाली आहे. बाधितांवर वाई, पाचवड, सातारा उपचार सुरू आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.
उलट्या-अतिसाराची बाधा
जावळी तालुक्यातील सरताळे येथील ग्रामपंचायतीच्या शिपायाने दारुच्या नशेत गावाच्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीत एक किलो टीसीएल पावडरच्या ऐवजी संपूर्ण पोतेच ओतले. आज (दि. 16 जून) सकाळी गावातील नियमितपणे नळ पाणीपुरवठा योजनेतून घराघरात हे पिण्याचे पाणी पोहचले. हे पाणी पिल्याने गावातील पन्नासहून अधिक ग्रामस्थांना गॅस्ट्रो सदृश्य उलट्या, अतिसाराची बाधा झाली.
एकाची प्रकृती गंभीर
याबाबत तपासणी केली असता हा सर्व प्रकार दूषित पाणी पिल्याने झाला असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. वाई, पाचवड आणि सातारा येथील रुग्णालयात बाधित व्यक्ती सध्या उपचार घेत आहेत. तर काही जण उपचार घेऊन घरी परतले आहेत. काहींवर अजून उपचार सुरू आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.
शिपायावर होणार कारवाई
याबाबत जावळीचे गटविकास अधिकारी सतीश बध्ये यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मंगळवारी (दि. 15 जून) सायंकाळी आणि बुधवारी (दि. 16 जून) पहाटे, असे दोन वेळा टीसीएल पावडर संबंधित गावच्या विहिरीत शिपायाकडून टाकण्यात आली. त्यामुळे बुधवारी सकाळच्या पाणीपुरवठ्यात हे पाणी वापरात आल्याने काही नागरिकांना उलट्या, अतिसार ची लागण झाली आहे. यातील सर्वांची प्रकृती चांगली असून एका ग्रामस्थाची प्रकृती नाजूक असल्याने अधिक उपचार सुरू आहेत. विहिरीतील सर्व पाण्याचा उपसा करण्यात आला आहे. गावामधील प्रत्येक घरी आरोग्य विभागाकडून तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये आणखी कोणाला लागण होऊ नये, याची दक्षता घेत आहोत. गुरुवारी (दि. 16 जून) सकाळी पाणीपुरवठा सुरळीत होईल. ग्रामपंचायतीच्या शिपायावर कारवाई करत आहोत, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - साताऱ्यात कोरोना रुग्णांत घट; पाॅझिटीव्हिटी रेट 8.33 वर