सातारा - रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटणच्या हक्काचे पाणी आणि इमान विकून 22 वर्षे लोकांना पाण्यापासून वंचित ठेवले. मंत्री असताना फक्त धोम-बलकवडी धरणातून फलटणला अडीच टीएमसी पाणी देऊन ते भगीरथ बनले. या कालावधीत १२ टीएमसी पाणी बारामतीला दिले. ते अडीच टीएमसीचे भगीरथ आहेत का, अशी टीका माण- खटावचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी रामराजेंवर केली.
रामराजेंचे पाप उघडे पडले आहे. त्यांनी तालुक्यातील जनतेला पाण्यापासून वंचित ठेवत बारामतीला पाणी दिले. त्यांच्याशी काय भांडायचे? त्यांच्याशी माझा वैयक्तिक वादाचा कोणताही विषय नाही. त्यांनी मंत्री असताना पाणी दिले नाही, आता काय देणार? त्यांना धोम बलकवडीचे फक्त अडीच टीएमसी पाणी फलटणला देता आले. आता ते माण, खटावला जिहे-कठापूर आणि टेंभू योजनेचे पाणी मिळू नये म्हणून कोर्टात जाऊन काहीतरी उद्योग करतील. पण विधानसभा निवडणुकीपूर्वी कठापूर आणि टेंभूचे निर्णय होतील. येत्या २ वर्षात माण आणि खटावला पाणी दिले नाही तर विधानसभेचा सदस्य म्हणून काम करणार नाही, असे वक्तव्य गोरेंनी केले.