सातारा - भुईंजच्या किसनवीर साखर कारखान्याची सद्यस्थिती गंभीर असल्याचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढे आले आहे. किसनवीर यांच्या नावाने असलेल्या या सहकारी संस्थेच्या कारभारा विषयी तक्रार येत असेल तर बाब गंभीर आहे. या कारखान्याच्या कारभाराची चौकशी साखर आयुक्तांमार्फत करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शेतकऱ्यांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट-
किसनवीर सहकारी साखर कारखान्याची सद्यस्थिती बिकट असून कारखाना यावर्षी सुरू होईल का नाही, अशी परिस्थिती आहे. या अनुषंगाने आमदार मकरंद पाटील, जिल्हा बँक संचालक नितीन पाटील तसेच शेतकरी सभासदांनी शासकीय विश्रामगृहावर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेतली आणि कारखान्यामध्ये सुरू असलेल्या गोंधळाची माहिती दिली. यावेळी त्यांना मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. निवेदन दिल्यानंतर अनेक सभासदांनी आपली मते मांडली, तर काहींनी कारखाना टिकला पाहिजे, असे पोटतिडकीने सांगितले. यानंतर मंत्री पाटील यांनी सहकारमंत्री म्हणून आपली भूमिका स्पष्ट करत चौकशीचे आदेश दिले.
सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील कारखाना सुरू झाला पाहिजे-बाळासाहेब पाटील म्हणाले, किसनवीर सहकारी साखर कारखाना यावर्षी सुरू होतो की नाही अशी परिस्थिती असेल तर प्रश्न खूप गंभीर आहे. तेथील कार्यपद्धती विषयी मला सभासदांनी माहिती दिली. यानंतर आमदार मकरंद पाटील, नितीन पाटील, बाबासाहेब कदम, प्रमोद शिंदे, शशिकांत पिसाळ यांनी निवेदन दिले. कारखाना सुरू झाला पाहिजे ही सर्व शेतकरी सभासदांची भावना आहे.
कारखाना कोणामुळे अडचणीत ?काही दिवसांपूर्वी कारखान्याची मालमत्ता जप्त करण्याबाबत साखर आयुक्तांनी सातारा जिल्हाधिकारी यांना आदेश दिले होते. किसनवीर साखर कारखाना अडचणीत आहे आणि तो कोणामुळे आला हे सभासदांनी आपल्याला सांगितले आहे. आता चौकशीचे आदेश दिले असल्याचे त्यांनी नमूद केले. खंडाळा कारखाना कराराची मी माहिती घेत आहे. त्याचबरोबर काही माहितीचा उल्लेख किसन वीरच्या अहवालात असणे आवश्यक आहे. कारखाना पूर्ण क्षमतेने चालत नाही. शेतकरी अस्वस्थ असल्याचे माझ्या लक्षात आले आहे. त्यामुळे कारखाना सूरू राहिला पाहिजे. किसन वीर कारखाना व्यवस्थापनाने एकाच व्यापाऱ्याला सर्व उत्पादन कमी दराने विकले ही बाब गंभीर व चुकीची आहे, असेही ना. पाटील म्हणाले.
२२ कोटींची एफआरपी थकलीनितीन पाटील यांनी सांगितले की, खंडाळा, प्रतापगड गेले दोन वर्षे बंद आहे. २२ कोटी एफआरपी दिलेली नाही. साखर आयुक्तांनी नोटीस बजावली असून त्याचा पंचनामा झाला आहे. तरीही शेतकऱ्यांना पैसे दिलेले नाहीत. तीनही कारखाने सुरु व्हावेत, अशी आमची मागणी आहे. कामगार वेतन नाही. १३ महिने पीएफ नाही. असेच सुरू राहिले तर आज नाहीतर उद्या टाळा लागणार आहे. ज्यांनी गैरकारभार केला त्यांच्यावर जबाबदारी निश्चित केली जावी आणि संपत्ती जप्त करून ती शेतकऱ्यांना द्यावी.