सातारा - जिल्ह्यातील दुष्काळी माण तालुक्यात अनेक अधिकारी आपणास पाहायला मिळतात. माण तालुका कायम दुष्काळी म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी शेतीला तर नाहीच, पण पिण्यासाठी पाणी मिळणे मुश्कील असते. या भागात महिला दिनानिमित्त दिनकर नाळे यांच्या वीरपत्नीसोबत नुकतीच आमच्या प्रतिनिधीने चर्चा केली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
या तालुक्यातील जवान दिनकर नाळे यांना जम्मू काश्मीर येथे १८ ऑक्टोबर २००९ ला वीरमरण आले. आज १० वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र शासनाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले आहे. तरीदेखील आपला परिवार जनावरे व थोडी फार शेती यावर चालवत आहे. मुलांची शाळा तसेच आजारी सासरे यांना सांभाळत आपल्या प्रपंचाचा गाडा हाकत आहोत.
पुढे त्यांनी सांगितले, की अनेक वेळा मुख्यमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार करूनसुद्धा घरबांधणीसाठी दोन गुंठे जमीन मिळू शकलेली नाही. मुख्य शहरापासून ५ किलोमीटरवर घर असल्याने मुलांची शाळा, तसेच इतर कामे सगळे स्वतःला चालत जाऊन करावे लागत आहे. शासकीय क्रीडा संकुलनाला वीरमरण आलेल्या जवान दिनकर नाळे यांचे नाव देण्याची मागणीसुद्धा पूर्ण होऊ शकली नाही. याचे खूप वाईट वाटते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. अनेक वेळा गॅस एजन्सी, पेट्रोल पंपासाठी अर्ज केले मात्र तेसुद्धा मिळाले नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पत्र मिळाली मात्र त्याची अंमलबजावणी झालीच नाही. योजना व घोषणा फक्त हवेतच राहिल्या आहेत. आपल्या पतीला देशसेवा करत हौतात्म्य आले, मात्र माझ्या परिवाराचा आधार स्तंभ मलाच व्हावे लागले आहे. दुष्काळी परिस्थिती असतानासुद्धा तीन चार जनावरां वरती आपली उपजीविका भागवत परिस्थितीला तोंड देत मी आज ठामपणे उभी आहे. मात्र शासनानेदेखील दखल घेऊन आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे, ही मागणी आहे, असे त्यांनी सांगितले.
![undefined](https://s3.amazonaws.com/saranyu-test/etv-bharath-assests/images/ad.png)