सातारा : वडीलांच्या नावाच्या फेरफाराची नोंद ( Note of modification ) करण्यासाठी तक्रारदाराकडून एक हजार रूपयांची लाच घेताना पुसेसावळी तालुका खटाव येथील मंडल अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ( AntiBribery Department ) रंगेहाथ पकडले. धनंजय मधुकर भोसले राहणार काशीळ, तालुका सातारा, असे त्याचे नाव आहे. खातेफोड झालेल्या फेरफाराची नोंद करण्यासाठी मंडल अधिकारी धनंजय भोसले ( Divisional Officer Dhananjay Bhosale ) याने तक्रारदाराकडे एक हजार रूपयांची लाच मागितली. त्यामुळे तक्रारदाराने सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली. पोलीस निरीक्षक सचिन राऊत यांनी पडताळणी केली असता मंडल अधिकाऱ्याने लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. मंगळवारी लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबीने धनंजय भोसले यास रंगेहाथ पकडले.
औंध पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद : लाच घेताना पकडलेल्या धनंजय भोसले याच्यावर रात्री उशीरा औंध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मंडल अधिकाऱ्यावरील कारवाईमुळे पुसेसावळीतील शासकीय कार्यालयांमध्ये खळबळ उडाली. गेल्या काही दिवसात महसूल विभागात लाचखोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. कारवाई होऊन देखील महसूल खात्यातील लाचखोरी कमी झालेली नाही. २ नोव्हेंबर रोजी कुळकजाई येथील तलाठ्याला चार हजारांची लाच घेताना पकडण्यात आले होते. त्यानंतर खटाव तालुक्यात मंडल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे.