सातारा - मलकापूर नगरपालिकेने मंगळवारी सकाळी सात ते रात्री नऊ दरम्यान पुन्हा जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्याला मलकापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून मंगळवारी संपूर्ण मलकापूर बंद होते. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे खबरदारी म्हणून मलकापूर प्रशासनाने हा निर्णय घेतला होता.
या दरम्यान मलकापूर शहरातील मेडिकल्स, किराणा दुकाने, भाजी मंडई, दूध विक्री, रुग्णालये सर्व बंद ठेवण्यात आले होते. ढेबेवाडी बाजूकडून मलकापूरात कोणीही येऊ नये, म्हणून आगाशिवनगरच्या वेशीवर बॅरिकेडस् लावून रस्ता बंद करण्यात आला होता. सर्व वसाहतींचे अंतर्गत रस्ते देखील बंद करण्यात आले होते. कराडहून मलकापूरकडे येणारे सर्व रस्तेही बंद करण्यात आले होते. यासोबतच कडक पोलीस बंदोबस्तही करण्यात आला होता.
स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि देशासाठी घरातच रहा, सुरक्षित रहा, बाहेर पडू नका. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने जनतेसाठीच जमावबंदी, संचारबंदी लागू केली आहे. त्याचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन मलकापूर नगरपालिकेने केले होते. त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.