सातारा - बुहचर्चित माढा लोकसभा मतदारसंघात दिवसेंदिवस नवीन राजकीय खेळ्या पाहायला मिळत आहेत. अनेक दिवसांपासून माण-खटावचे आमदार तसेच भाजप-सेनेचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांच्या निवडीच्या आधी अनेक ठिकाणी गुप्त बैठका झाल्या होत्या. त्यामुळे, अनेक दिग्गजांची तिकिटे कापली गेली. आज मात्र या दोस्ती गटात असणारे दोस्त एक-मेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. ज्यामुळे कोण कोणात्या पक्षाचे काम करते हे सांगणे अवघड झाले आहे. असाच काहीसा प्रकार मंगळवारी माण खटाव तालुक्यात घडला आहे.
माण-खटावचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यांचा प्रचार करायचा सोडून त्यांचे सहकारी मित्र व भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचार सुरू केला आहे. त्यासाठी माण-खटाव तालुक्यातील कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित केला होता. त्यात त्यांनी आपण राष्ट्रवादीला कदापी मत देणार नसल्याचे व्यासपीठावरून जाहीर केले आहे.
आमदार गोरे म्हणाले, एका बाजूला राष्ट्रवादीचा उमेदवार आहे. दुसऱ्या बाजूला भाजपचा उमेदवार आहे. आमचे कोणत्याही पक्षाशी काही देणे-घेणे नाही. आम्ही कुठल्याही पक्ष्याला मदत करणार नसल्याचे सागंताना त्यांनी आम्ही घड्याळाला मतदान करणार नसल्याचेही स्पष्ट केले. तसेच माझ्या कार्यकर्त्यांचीदेखील हीच भूमिका असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
रणजितदादा हा माझा घरातील उमेदवार आहे. घरातील तसेच पक्षातला कोणी माझ्यासोबत नव्हता. तेव्हापासून तो माझ्या सोबत आहे. त्यामुळे सगळा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. रणजितसिंहचे वडील हिंदुराव नाईक-निंबाळकर हे खासदार होते. त्यावेळी आपल्या भागातील अनेक योजनांचा पाया त्यांनी खांदला आहे. ते कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष होते. आता वेळ आली आहे. आपण ही त्यांना त्यांची राहिलेली स्वप्न पूर्णकरण्यासाठी मदत करायची आहे. आपल्या मातील पाणी पाजण्यासाठी ज्यांनी कष्ट केलं त्यांचा हा पुत्र आहे. माझा मित्र नंतर, असे सांगत निंबाळकर यांना त्यांनी व्यासपीठावर बोलवून घेतले व कार्यकर्त्यांनि कामाला लागण्याच्या सूचना दिल्या.