सातारा - जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व राजमाता छत्रपती कल्पनाराजे भोसले यांच्या खासगी मालकीचे असणारे शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाचे मंदिर 3 महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे येथील व्यावसायिक तसेच सेवाधारी यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे 'शंभू महादेवा... उघड आता दार', अशी प्रार्थना येथील व्यावसायिक करत आहेत.
'शंभू महादेवा... उघड आता दार', शिंगणापुरातील व्यावसायिकांची आर्त हाक कोरोनाच्या जागतिक संकटामुळे सुमारे 3 महिन्यांपासून बंद असलेली धार्मिक स्थळे 8 जूनपासून सुरू करण्यास केंद्रसरकारने परवानगी दिली आहे. मात्र, राज्य सरकारने अद्यापही राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे धार्मिक स्थळांच्या ठिकाणी असलेल्या व्यावसायिक, पुरोहित, सेवाधारी अडचणीत आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाचे मंदिर 17 मार्चपासून बंद आहे. एप्रिल महिन्यात होणारी येथील वार्षिक यात्राही रद्द झाल्यामुळे येथील व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला. मंदिर परिसरातील नारळ, बेलफुल, पेढे, प्रसाद, फोटोफ्रेम, खेळणी हॉटेल यासारखी जवळपास 200 हून अधिक दुकाने तीन महिन्यांपासून बंद असल्याने व्यापारी, व्यवसायिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. तसेच मंदिरावर उदरनिर्वाह असलेले बडवे, जंगम, कोळी, घडशी, गुरव समाजातील जवळपास 100 हून अधिक सेवाधारी मंडळीही आर्थिक संकटात सापडले आहेत. आतातपर्यंत कसेतरी 3 महीने काढले. परंतू, लॉकडाऊन शिथिल होऊनही शिंगणापूर मंदिर अद्यापपर्यंत बंदच असल्याने येथील व्यावसायिक, सेवाधारी, पुजारी यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने काही शर्थी, अटींवर शंभू महादेव मंदिर उघडण्यास परवानगी देण्याची मागणी भाविक भक्तांसह व्यावसायिकांतून होत आहे. त्यामुळे 'उघड दार देवा, महादेवा उघड दार देवा', अशी आर्त हाक येथील दुकानदारांकडून दिली जात आहे.
उत्पन्नाचा सीझन वाया गेला
शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या दर्शनासाठी चैत्र यात्रेपासून श्रावण महिन्यापर्यंत भाविकांची गर्दी असते. चैत्र यात्रा, उन्हाळी सुट्टी, ग्रामीण यात्रा, लग्नसराई, आषाढीवारी व श्रावण महिना अशी सलग चार महिने भाविकांची वर्दळ असल्याने येथील व्यावसायिकांची कोट्यवधींची उलाढाल होते. परंतू, कोरोनाच्या संकटामुळे मंदिर बंद असल्याने यावर्षी उत्पनाचा मुख्य सिझन वाया गेल्याने यापुढील आठ महिने कसे काढायचे असा प्रश्न येथील व्यवसायिकांसमोर निर्माण झाला आहे.