सातारा - चिमणगाव (ता. कोरेगाव) येथे सरकारमान्य रास्त भाव धान्य दुकानामध्ये बेकायदेशीर देशी-विदेशी दारूची विक्री करण्यात येत होती. याबाबत माहिती पोलिसांनी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी विक्री करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीकडून 7 लाख 8 हजार 576 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
रेशन दुकानात दारू विक्रीची माहिती -
स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे निरीक्षक किशोर धुमाळ यांना चिमणगावात एक व्यक्ती सरकारमान्य रास्त भाव धान्य दुकानामध्ये बेकायदेशीर दारूची चोरटी विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्या अनुषंगाने त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांचे एक पथक कारवाईसाठी पाठवले.
स्कार्पिओसह दारू जप्त -
या पथकाने आज चिमणगाव येथे सरकारमान्य रास्त भाव धान्य दुकान क्र. ३३ येथे छापा टाकला. त्यावेळी संबंधित दुकानामध्ये व दुकान मालकाच्या स्कार्पिओमध्ये देशी-विदेशी दारूच्या बाटल्या व इतर असा एकूण ७ लाख ८ हजार ५७६ रुपयांचा माल मिळून आला.
कोरेगाव पोलिसात गुन्हा -
दुकानदाराने जिल्हाधिकाऱ्यांच्या कोविड-१९ अनुषंगाने लागू असलेल्या आदेशाचा भंग केल्याने त्याच्या विरुध्द कोरेगाव पोलीस ठाण्यात कलम १८८,२६९,२७० महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई), आपत्ती व्यवस्थापन २००५चे कलम ५१ (ब), साथीचे रोग अधिनियम १८९७चे कलम २, महाराष्ट्र कोविड-१९ विनियमन २०२०चे कलम ११ प्रमाणे कारवाई करण्यात आली.
हे आहेत शिलेदार -
ही कारवाई किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, सहायक फौजदार जोतीराम बर्गे, हवालदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, नीलेश काटकर, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, संकेत निकम यांनी केली.