सातारा : सोमेश्वर साखर कारखान्याने मळी मिश्रीत पाणी नदीपात्रात सोडल्यामुळे नीरा नदीचे पात्र दूषित झाल्याचे सांगितले जात आहे. नदीचे पाणी दूषित झाल्याने आणि मृत माशामुळे परिसरात दुर्गंधी देखील पसरली आहे. या नीरा नदीला नाल्याचे स्वरूप आले आहे. मृत मासे गोळा करून काहीजण ते विक्रीसाठी नेऊन नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मळी मिश्रीत पाणी सोडणार्या संबंधित कारखान्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मासे पकडण्यासाठी नागरीकांची झुंबड : होळ-कोर्हाळे खुर्द भागातील बंधार्यात दूषित पाणी असल्याने बंधार्यातील मासे स्वच्छ पाण्याच्या दिशेने झुंडीने निघाले होते. बंधार्यातील पाणी उंचावरून पडत असल्याने त्यांचा प्रवास थांबला आणि मासे पकडण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली. चारचाकी वाहनात भरून लोकांनी मासे नेले. होळ (ता. बारामती) येथील ढगाई मंदीरापाठीमागील नीरा नदीच्या बंधार्यावर हे चित्र पाहायला मिळाले.
कारखान्यांनी सोडले दूषित पाणी : मागील आठ दिवसांपासून कारखाने मोठ्या प्रमाणात दूषित पाणी सोडत आहेत. त्यातच कडक उन्हामुळे पाणीसाठाही कमी झाला आहे. परिणामी माशांच्या प्रवासाचा वेग वाढला असून मुरूम बंधार्यातील पाणी खालच्या होळ बंधार्यात उंचावरून पडू लागले आहे. त्यामुळे माशांच्या प्रवासाला अडथळा निर्माण झाला आणि स्वच्छ पाणी पडत असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झुंडीने मासे येऊ लागले.
सांगलीतही प्रदूषणाचा प्रश्न गंभीर : कृष्णा नदीमधे मार्च महिन्याच्या सुरुवातीला दत्त इंडिया साखर कारखान्याने सोडलेल्या रसायन मिश्रित मळीमुळे लाखो मासे तडफडून मृत्युमुखी पडले होते. तसेच सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकासुद्धा कृष्णा नदीमधे विना प्रक्रिया सांडपाणी सोडत असल्यामुळे लाखो मासे, नदीतील इतर जलचर, नदीवर अवलंबून असलेले प्राणी-पक्षी तसेच माणसांचे जीवन धोक्यात आणत असल्याने याप्रश्नी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील उदगाव (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीपात्रात देखील रासायनिक मळीमुळे लाखो मासे मृत्युमुखी पडले होते.
हेही वाचा : Modi Surname Defamation Case : मानहानीच्या खटल्यात आज राहुल गांधी करणार अपील, प्रियंकासोबत सुरतला रवाना