कराड- कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा अखेर बिगुल वाजला आहे. कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून आजपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. दि. 29 जून रोजी मतदान तर 1 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.
आष्टेकर यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती
कृष्णा कारखाना निवडणुकीसाठी जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कराडचे उपनिबंध मनोहर माळी, कोरेगावचे संजय सुद्रिक व महाबळेश्वरचे जे.पी. शिंदे हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत.
17 जूनपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत
शासकीय सुट्टीचे दिवस वगळून अर्ज भरण्यास परवानगी देण्यात आली आहे. पुढील पाच दिवस अर्ज भरण्यास मुदत असून 2 जून रोजी अर्जांची छाननी होणार आहे. 17 जूनपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. अंतिम उमेदवारांची यादी 18 जून रोज प्रसिध्द होईल. 29 जून रोजी मतदान आणि 1 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी 47 हजार 160 सभासदांची अंतिम यादी जाहीर झाली आहे. अक्रियाशील 820 सभासदांचा देखील मतदार यादीत समावेश आहे.
कृष्णा कारखान्यात भाजप समर्थकांची सत्ता
भाजप समर्थक डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले यांच्या गटाची सध्या कृष्णा कारखान्यात सत्ता आहे. कारखान्याच्या यंदाच्या निवडणुकीत भोसलेंना सत्तेपासून रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला राबविण्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते (काँग्रेस) आणि अविनाश मोहिते (राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष) यांच्या गटांना एकत्र आणण्याच्या हालचाली गेल्या सहा महिन्यांपासून सुरू होत्या. या अनुषंगाने अनेकदा बैठका आणि चर्चा झाल्या आहेत. तसेच दोन्ही गटांचे एकत्रीकरण होईल, असे सांगण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री तसेच कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री दिवंगत विलासकाका उंडाळकरांचे पूत्र आणि जिल्हा परिषद सदस्य अॅड. उदयसिंह पाटील, सातार्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, जलसंपदा मंत्री जयंत पाटील महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे हे दोन्ही मोहिते गटांच्या एकत्रीकरणासाठी प्रयत्न करत आहेत.
कृष्णा कारखान्याचे कार्यक्षेत्र
कराड, वाळवा, कडेगाव आणि शिराळा या चार तालुक्यात कृष्णा कारखान्याचे कार्यक्षेत्र विभागले आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री दिवंगत उंडाळकरांचे सुपूत्र अॅड.उदयसिंह पाटील (कराड दक्षिण), सहकार व पणन तथा सातार्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील (कराड उत्तर), कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम (पलूस-कडेगाव) आणि शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक यांची भूमिका या निवडणुकीत महत्वपूर्ण ठरणार आहे. आतापर्यंत दिवंगत विलासकाका उंडाळकर हे कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत किंगमेकर ठरत होते. त्यांच्या पश्चात होणारी कारखान्याची ही पहिलीच निवडणूक आहे.