सातारा - भारतीय लष्कराने 26 जुलै 1999 रोजी कारगिलमध्ये विजयी झेंडा फडकावला. तेव्हापासून 26 जुलैला कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. याच युद्धात साताऱ्यातील महादेव निकम हुतात्मा झाले होते. त्यांच्या शौर्याची आणि पराक्रमाची गाथा आजही येथील पंचक्रोशीत ऐकायला मिळते. याबाबत कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून ईटीव्ही भारतने हुतात्मा महादेव निकम यांच्या कुटुंबीयांसोबत संवाद साधला आहे.
तिचा जन्म होऊन काही मिनीटंच उलटली असतील अन् भारतीय लष्करातून तो फोन आला...
कारगिल योध्याच्या पत्नीसाठी तेव्हा जणू आभाळच फाटले होते. हातात काही तासांचे लेकरु घेऊन ती गावी पोहचली खरी, पण समोरील दृष्य पाहून तिच्या डोळ्यापुढे आंधारीच आली. तिरंग्यात लपेटलेला मृतदेह समोर निश्चल पडला होता. हुतात्मा महादेव निकम यांचा तो मृतदेह होता. हुतात्मा महादेव निकम अमर रहे च्या जयघोषणा आजही त्यांना ऐकू येतात. कुटुंबात एक कळी उमलत असताना ही आनंदवार्ता ऐकायला कुंकवाचा धनी नाही, या जाणिवेने श्रीमती उज्वला निकम यांच्या डोळ्याच्या कडा आजही पाणवतात.
साताऱ्याजवळच्या कोडोलीत श्रीमती उज्वला निकम, मुलगी विजयासह राहतात. 1999 च्या कारगिल युध्दात महादेव निकम देशासाठी कामी आले. पाकिस्तानी सैन्याच्या काही गोळ्यांनी त्यांच्या देहाचा वेध घेतला. इकडे रहिमतपूरमध्ये नऊ महिन्याच्या गरोदर उज्वला निकम माहेरपणाला गेल्या होत्या. 26 जूनला सकाळी 11 वाजता त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. त्यानंतर दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास चुलत्यांजवळ निरोप आला.
श्रीमती निकम याबाबत सांगताना म्हटल्या की., पावण्यांची तब्ब्येत बिघडली आहे, आपल्याला गावी अंतवडीला ( ता. कराड, जि. सातारा) जावे लागेल असे सांगण्यात आले होते. मात्र, गावात प्रवेश केला तर रस्त्याच्या दुतर्फा लोक उभे होते. रस्त्यावरील लाईट घालवण्यात आले होते. पुरुषांच्या डोक्याला टाॅवेल गुंडाळलेले होते. गावात काय झाले, मला काहीच अंदाज लागत नव्हता. घराजवळ गर्दी लोटली होती. दारात लाकडी पेटी होती. त्यावर आमच्या घराचा पत्ता लिहिलेले लेबल होते. तोपर्यंत काय झाले, याचा मला अंदाज येत नव्हता. पेटी उघडल्यानंतर पती महादेव यांचा मृतदेह पहायला मिळाला. मला काही सुचायचे बंद झाले. नंतर शुद्धही हरपली.
हेही वाचा - गृहमंत्र्यांनी घेतली 'त्या' आजींची भेट.. साडी चोळी आणि एक लाखांची मदत
आमच्या मुलीचा जन्म दिवस आणि पती महादेव यांचा शहीद दिवस एकच, 26 जून. या घटनेनंतर काही दिवसांनी लष्करातील एक वरिष्ठ अधिकारी आम्हाला भेटायला आले होते, त्यांनीच 'ऑपरेशन विजय' वरून कन्येचे नामकरण 'विजया' असे केल्याचे श्रीमती उज्वला निकम यांनी सांगितले.
"वडीलांच्या स्मृतीदिनीच माझा जन्मदिवस असल्याने मला कधीही स्वत:चा वाढदिवस इतरांसारखा साजरा करावासा वाटला नाही. मी कधीही माझा वाढदिवस साजरा करत नाही'' असे हुतात्मा मदादेव निकम यांची मुलगी विजयाने सांगितले.
आज विजया 21 वर्षांची आहे. साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी काॅलेजमध्ये नुकतेच तिने बी. ए. केले आहे. वडीलांचा देशसेवेचा वारसा विजयाला पुढे चालवायचा आहे. साताऱ्याच्या कन्याशाळेत सुरुवातीचे शिक्षण घेतल्यानंतर निव्वळ एनसीसी नाही म्हणून तिने काॅलेज बदलले. एनसीसीमधील 'सी सर्टिफिकेट'ची परिक्षा तिने चांगल्या गुणवत्तेने नुकतीच दिली आहे. 'मला पुढे जाऊन भारतीय लष्करात दाखल व्हायचये, असे विजया अभिमानाने सांगते. कंबाईन डिफेन्स सर्व्हीसमध्ये जाण्यासाठी मी सध्या तयारी करत आहे, असे विजयाने ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.