कराड (सातारा) : कृष्णा हॉस्पिटल परिसरातून मोटारसायकली चोरणाऱ्या पलूस (सांगली) येथील तीन चोरट्यांना कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. तसेच चोरीच्या 11 मोटारसायकलीही जप्त केल्या आहेत. प्रदीप तानाजी सोमोशी, राजू रामचंद्र जाधव आणि प्रशांत वसंतराव जाधव (सर्व रा. पलूस) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कराडचे पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक तयार केले. या पथकातील पोलीस नाईक संजय जाधव यांना खबऱ्यांमार्फत माहिती मिळाली की, पलूस येथील चोरट्यांनी कृष्णा हॉस्पिटलसमोरून मोटरसायकली चोरी करून विटा (ता. खानापूर) परिसरात विकल्या आहेत. या माहितीच्या अनुषंगाने हवालदार संजय जाधव, जयसिंग राजगे, पोलीस नाईक तानाजी शिंदे, मारुती लाटणे यांच्या पथकाने तपास केला. यात पलूस येथील चोरट्यांनी कराडसह वाळवा तालुक्यातील बहे-बोरगाव, आरग, बेडग अशा ठिकाणाहून मोटरसायकली चोरल्याचे स्पष्ट झाले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, सहाय्यक फौजदार सतीश जाधव, हवालदार नितीन येळवे, जयसिंग राजगे, पोलीस नाईक संजय जाधव, सचिन साळुंखे, तानाजी शिंदे, कॉ. मारुती लाटणे, विनोद माने, प्रफुल्ल गाडे, आनंदा जाधव यांनी ही कारवाई केली.