कराड (सातारा) - कराड नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत १ लाख लोकसंख्येच्या गटात सलग दुसऱ्यांदा देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. गुरुवारी (दि. २०) पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे याबाबतची अधिकृत घोषणा होणार असून कोरोनामुळे ऑनलाइन पद्धतीने मुंबई येथे मंत्रालयात या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
कराड नगरपालिकेच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांना पुरस्कार स्वीकारण्यासाठी मुंबईत येण्याचे निमंत्रण राज्य नागरी विकास अभियान संचालनालयातर्फे देण्यात आले आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी कराडचे तत्कालीन मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनाही उपस्थित राहण्यास कळविण्यात आले आहे.
कराड पालिकेने १ लाख लोकसंख्येच्या आतील शहरांमध्ये गतवर्षीसुद्धा देशात प्रथम क्रमांक पटकावला होता. केंद्रीय नगरविकास व शहरी आवास मंत्रालयाकडून कराड नगरपालिकेला स्वच्छ सर्वेक्षण पुरस्काराबाबत कळविण्यात आल्यानंतर नगरसेवकांसह आरोग्य कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला. शहरातील कचरा संकलन, विलगीकरण व त्यावर प्रक्रिया करण्यात कराड नगरपालिका यशस्वी ठरली आहे. त्यामुळे पालिकेस कचरामुक्त शहराचे 'थ्री स्टार' मानांकन प्राप्त झालेले आहे.