कराड (सातारा) - पेट्रोल, डिझेल, गॅस आणि महागाई विरोधात माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कराडमध्ये काँग्रेसने सायकल रॅली काढली. या रॅलीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल तुम्हे आना है, देश को बचाना है! ही घोषणा देत चैतन्य निर्माण केले. कराडचे प्रवेशद्वार असलेल्या कोल्हापूर नाक्यावरील महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन करून इंधन दरवाढीविरोधातील काँग्रेसच्या या सायकल रॅलीला प्रारंभ झाला.
माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य अॅड उदयसिंह पाटील-उंडाळकर, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, कराड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र माने, सातारा जिल्हा अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष झाकीर पठाण, कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष हेमंत जाधव यांच्यासह कराड दक्षिण आणि उत्तर मतदार संघातील कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते.
ही दरवाढ नसून केंद्र सरकारने केलेली करवाढ
मोदी सरकारला कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याचा आरोप यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. महागाईचा मुद्दा पुढे करून मोदी सरकार सत्तेवर आले. परंतु, मोदी सरकारनेच जनतेच्या डोळ्यात धूळ फेकून महागाईचा डोंगर जनतेसमोर उभा केला आहे. कच्च्या तेलाच्या किंमती कमी असताना मोदी सरकार टॅक्स वाढवून जनतेकडून कर रूपाने पैसे उकळत आहे. ही दरवाढ नसून केंद्र सरकारने केलेली करवाढ असल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
12 कोटी लोकांच्या नोकर्या गेल्या
इंधन दरवाढीमुळे महागाई वाढली असून सामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने राज्यभर सायकल रॅलीचे आयोजन आणि स्वाक्षरी मोहीम राबवून इंधन दरवाढ आणि महागाईचा निषेध करत पेट्रोल पंपांवर स्वाक्षरी मोहीम राबवून जनतेचा रोष सरकारपर्यंत पोहोचवत आहोत. सर्व पातळ्यांवर केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. सरकार हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहे. सरकारी कंपन्या, सरकारी मालमत्ता विकून हे सरकार चाललेले आहे. सामान्यांवर इंधन कराचा बोजा टाकला आहे. 12 कोटी लोकांच्या नोकर्या गेल्या आहेत. 23 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली गेले आहेत. अडचणीतून मार्ग काढण्याऐवजी मोदी जनतेचीच परीक्षा घेत आहेत. म्हणून मोदी हटाव, देश बचाव, हा नारा आम्ही सायकल रॅलीच्या माध्यमातून देत आहोत, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
मनमोहन सिंग सरकारने कर लावला नव्हता
सध्या आयात केल्या जाणार्या तेलाच्या किमंती 60 ते 65 डॉलर प्रति बॅरल इतक्या आहेत. मनमोहन सिंग सरकारच्या काळात प्रति बॅलर त्या 124 डॉलरपर्यंत गेल्या होत्या. तरीही पेट्रोल, डिझेलचे दर कमी होते. कारण, मनमोहन सिंग सरकारने कर लावले नव्हते. परंतु, आता मोदी सरकार तिजोरीतील तोटा कमी करण्यासाठी लोकांवर कर लावून आपली तिजोरी भरायचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
हेही वाचा - आरोपीला पकडण्यासाठी पोलीस बनले शेतमजूर, वाचा सातारा पोलिसांची अभिमानास्पद कामगिरी
हेही वाचा - मोदी-पवार भेट म्हणजे विरोधी पक्षांच्या नेत्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न - पृथ्वीराज चव्हाण