कराड (सातारा)- पावसाचा जोर वाढल्याने कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात २ टीएमसीने वाढ झाली आहे. यामुळे पाणी पातळीत वाढ झाल्याने धरण पायथा वीजगृहातून पूर्वेकडील सिंचनासाठी सोडण्यात आलेले पाणी बंद करण्यात आले आहे.
जून महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पाऊस झाला. परंतु, त्यानंतर पावसाने दडी मारली. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांची अवस्था बिकट झाली. शेतकऱ्यांची चिंताही वाढली होती. भात, भूईमुंगासारख्या पिकांच्या वाढीवर परिणाम झाला होता. सध्या या पिकांना मोठ्या पावसाची गरज होती. अशातच दोन दिवसांपासून पावसाला सुरूवात झाल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. सोमवारपासून चांगला पाऊस झाल्यामुळे नद्यांची पाणी पातळी देखील वाढली आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर असून गेल्या 24 तासात कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात २ टीएमसीने वाढ झाली आहे. 4 दिवसांपूर्वी कोयना धरण पायथा वीजगृह कार्यान्वित करून पूर्वेकडील सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले होते. परंतु, पावसाचा जोर वाढल्याने पायथा वीजगृह बंद करण्यात आले आहे.
कोयना धरणातील पाणीसाठा ५४.९३ टीएमसी झाला आहे. धरणात सध्या १६ हजार ९५६ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. १७ तासांमध्ये कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे ९७ मि.मी, नवजा आणि महाबळेश्वर येथे प्रत्येकी ९४ मि.मी आणि वाळवण येथे सर्वाधिक १०४ मि.मी पावसाची नोंद झाली आहे.