सातारा : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मला भाजपकडून पक्षप्रवेशाची ऑफर आली होती, मात्र मी आदरणीय शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ आहे व राहीन असे राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीवेळी सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीतील अनेक नेते भाजपमध्ये गेले मात्र आपण का गेला नाहीत, या प्रश्नावर शिंदेंनी हे स्पष्टीकरण दिले आहे.
शरद पवारांमुळे राजकारणात आल्याची जाण-शिंदे
मी आदरणीय शरद पवार यांच्यामुळे राजकारणामध्ये आलो आणि त्यांच्यामुळेच इथपर्यंत आलो. आज मला मिळत असलेला मानसन्मान हा आदरणीय पवार साहेब व राष्ट्रवादी काँग्रेसमुळे मिळतोय याची मला जाण आहे. मी कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी सोडणार नाही, हे माझं मत त्यावेळीही ठाम होतं. शिवसेना भाजप युती सत्तेत असताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांच्याकडूनही तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून मला ऑफर आल्या होत्या. 'तुम्ही राजीनामा द्या पोटनिवडणूक लागली तरी तुम्हाला निवडून आणू, मंत्री करू अशा त्या ऑफर होत्या. परंतु ही ऑफर मी त्याच वेळी धुडकावली होती' असे शिंदे यांनी म्हटले आहे. नंतरच्या काळात जिल्ह्यातील अनेक नेतेमंडळी भाजपमध्ये जात असताना मला पुन्हा निरोप आला. 'आम्ही दिल्लीला जात आहोत, तुम्हालाही सोबत नेतो. भविष्यकाळामध्ये भाजपकडून तुम्हाला चांगली संधी दिली जाईल असेही शशिकांत शिंदेंनी म्हटले आहे.
हेही वाचा - मला मुख्यमंत्री होण्याची घाई नाही - अशोक चव्हाण