सातारा - मराठ्यांची चौथी राजधानी असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावर स्वच्छतेचे काम सुरू असताना काही युवकांना ऐतिहासिक दगडी चौथरा व सुमारे एक टन वजनाची लोखंडी पेटी सापडली आहे. ही पेटी ब्रिटिशकालीन पेटी असून काडतूस व इतर दारुगोळा आदी ठेवण्यासाठी तिचा वापर होत असावा, असा जाणकारांचा कयास आहे. या ठिकाणी मातीच्या ढिगार्यात आणखी दोन पेटी असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शोधला चौथरा आणि सापडली पेटी
गड -किल्ल्यांचे संवर्धन करण्याचे कार्य करणाऱ्या राजा शिवछत्रपती परिवार या संस्थेचे काही कार्यकर्ते अजिंक्यतारा किल्ल्यावर, ऐतिहासिक वाड्याजवळ स्वच्छतेचे काम करत होते. त्यावेळी त्यांना ढिगार्याखाली एक चौथरा आढळून आला. तिथेच बाजूला लोखंडी पेटी सापडली. याविषयी बोलताना संस्थेची युवा कार्यकर्ता विशाल शिंदे म्हणाला, पेटी प्रचंड जड व अद्यापी भक्कम असल्याने तिला मातीतून बाहेर काढून ठेवायला 15 युवकांचे बळ लागले. पेटीवर इंग्रजीत काही शब्द कोरलेले आहेत. त्यांचा नेमका बोध होत नसला तरी ही पेटी ब्रिटिश काळात काडतूसे ठेवण्यासाठी वापरली गेली असावी, असा अंदाज आहे.
आणखी दोन वस्तू असण्याची शक्यता
ही पेटी ब्रिटिशकालीन अशून सुमारे दीडशे वर्षे जुनी असावी, असा अंदाज छत्रपती शिवाजी संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी व्यक्त केला. अशा आणखी दोन पेट्या याठिकाणी मिळण्याची शक्यता आहे. पुरातत्व विभागाला याबाबत माहिती देण्यात आली आहे. सखोल अभ्यासाअंती निश्चित कालखंड किंवा तिचा वापर समजू शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रेल्वेची पेटी असण्याची शक्यता
या पेटीची रचना पाहता ती लटकवली जात असावी. पेटीला कुलूप लावायचा कडी-कोयंडा नसल्याने तिला तिजोरी म्हणता येणार नाही. अशा पद्धतीची पेटी ब्रिटिश काळात रेल्वे खात्यात वापरली जात असे. तीच या ठिकाणी काडतूसए ठेवण्यासाठी आणली गेली असावी. मात्र, ती इथं किल्ल्यावर कशी आली यावर अधिक प्रकाश पडायला हवा, असे मत साताऱ्यातील जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्थेचे कार्याध्यक्ष निलेश पंडित यांनी व्यक्त केले.
किल्ल्याकडे पुरातत्वने लक्ष द्यावे
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर अजिंक्यतारा किल्ल्यावर संभाजी पूत्र छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेक झाला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू, छत्रपती येसूबाई, महाराणी ताराबाई यांचे वास्तव्य किल्ल्यावर राहिले आहे. त्यांच्या राजप्रासादाच्या पाऊलखुणा अद्यापही पाहायला मिळतात. सातारा नगर पालिकेच्या अखत्यारीत हा किल्ला येतो. सुरक्षा आणि संवर्धनासाठी पालिकेने सापडलेली लोखंडी पेटी पुरातत्व विभागाकडे सुपूर्द करावी. तसेच किल्ल्यावर मातीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही वस्तू दडल्या असाव्यात. ही शक्यता लक्षात घेऊन पुरातत्व विभागाने उत्खनन व ऐतिहासिक वस्तूंचे जतन करावे, अशी अपेक्षा इतिहासप्रेमी सातारकरांतून व्यक्त होत आहे.
हेही वाचा - सातारा : ऑलम्पिकसाठी पात्र प्रवीण जाधव व पालकांचे मोदींकडून कौतुक