सातारा - कराड शहरासह ग्रामीण भागाला रविवारी रात्री परतीच्या पावसाने झोडपले. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात रात्री ८ वाजल्यापासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे शहरात तसेच ग्रामीण भागात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या मोडून पडल्या. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे शहर आणि तालुका अंधारात होता.
रविवारी सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवत होते. मात्र, रात्री सातच्या सुमारास आकाशात काळे ढग जमा झाले आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. सुमारे तीन तास विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे कराडच्या दत्त चौक परिसरात गुडघाभर पाणी साचले होते. तसेच सर्व रस्ते निर्मनुष्य दिसत होते. वादळी वारे आणि पावसामुळे मलकापूर फाट्यावरील भाजीमंडईच्या शेजारील कृष्णा हॉस्पिटल कंपाऊंडच्या भिंतीवर झाड पडल्याने भिंतीचा मोठा भाग कोसळून रस्त्यावर पडला.
ग्रामीण भागातही पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. वाऱ्यामुळे उसाचे पीक आडवे झाले. वादळी वारे आणि पावसामुळे वीज पुरवठा खंडीत झाल्याने कराड शहर तसेच ग्रामीण भाग अंधारात बुडाला. रात्री ८ वाजता पावसाला सुरूवात झाली. मध्यरात्रीनंतरही पाऊस सुरूच होता.