सातारा : अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेला महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकाल उद्या लागणार आहे. याबाबत स्वत: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय चंद्रचूड यांनी घोषणा केली आहे. तर महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित राज्यपालांच्या महाबळेश्वर दौऱ्यासंदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे. राज्यपाल रमेश बैस हे आजपासून दि. १७ मे पर्यंत महाबळेश्वर दौऱ्यावर येणार होते. मात्र, त्यांचा दौरा अचानक लांबणीवर गेला आहे. सत्तासंघर्षावरील निकालाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा लांबणीवर पडल्याचे समजते.
पहिलाच दौरा लांबणीवर: महाराष्ट्राचे राज्यपाल हे दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरला येतात. राज्यपाल पदाची सूत्रे घेतल्यानंतर रमेश बैस यांचा दि. १० ते १७ मे असा दौरा निश्चित झाला होता. परंतु, राज्यपालांचा पहिला महाबळेश्वर दौरा अचानक लांबणीवर गेला आहे. तर राज्यपाल रमेश बैस हे पहिल्यांदाच सातारा जिल्ह्यात येत असल्याने प्रशासनाने राज्यपाल दौऱ्याची तयारी केली होती. या दौऱ्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमसुद्धा झाले असते. मात्र, हा दौरा लांबणीवर गेला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दौऱ्याच्या तारखा अनिश्चित: लांबणीवर गेलेल्या राज्यपालांच्या दौऱ्याच्या पुढील तारखा निश्चित नाहीत. गुरूवारी सत्तासंघर्षावर निकाल जाहीर होणार आहे. निकालानंतर राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यास राज्यपालांचा महाबळेश्वर दौराच रद्द होऊ शकतो. तर अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला सत्तासंघर्षाचा निकाल गुरूवारी जाहीर होणार आहे. या निकालाची राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे. सुप्रीम कोर्टानेच उद्या निकाल देणार असल्याचे जाहीर केल्याने राज्यपालांनी आपला दौरा काही काळासाठी पुढे ढकलला असल्याची देखील चर्चा आहे. तसेच या घटनापीठातील दुसरे ज्येष्ठ न्यायमूर्ती एम. शाह १५ मे रोजी निवृत्त होणार आहेत, त्यामुळे याप्रकरणी जलद निकाल येईल, असे बोलले जात होते.
हेही वाचा -
- Governor Ramesh Bais राज्यपाल रमेश बैस यांचे मुंबईत आगमन आज घेणार राज्यपालपदाची शपथ
- Governor Ramesh Bais मॅरेथॉनमुळे मुंबईने जपली दातृत्व संस्कृती राज्यपाल रमेश बैस यांचे प्रतिपादन
- Maharashtra Day 2023 महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपाल रमेश बैस यांनी केले ध्वजारोहण