सातारा परतीच्या दमदार पावसामुळे काठोकाठ भरलेल्या कोयना धरणाचे दरवाजे पुन्हा एक फुटाने उघडण्यात आले आहेत. धरणाच्या सहा वक्र दरवाजांतून ९४६३ क्युसेक आणि पायथा वीजगृहातून १०५० क्युसेक, असा एकूण १०५१३ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
धरणात शंभर टक्के पाणीसाठा कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. बुधवारी दुपारी १२ वाजता धरणाच्या क्षमतेएवढा म्हणजे १०५.२५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण शंभर टक्के भरले, असून पावसामुळे धरणात पाण्याची आवक होत असल्याने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने घेतला आहे.
कोयना नदीचे पाणी पात्राबाहेर गेल्या काही दिवस कोयना धरणातून सातत्याने विसर्ग सुरू असल्याने कोयना नदी दुथडी भरून वाहत आहे. आता धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने विसर्ग वाढला आहे. त्यामुळे कोयना नदीचे पाणी पात्राबाहेर गेले आहे. कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने, नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
धरणाचे दरवाजे साडे चार फुटांवर स्थिर - पावसाचा जोर वाढल्याने धरणाचे दरवाजे दुसऱ्यांदा उघडण्यात आले आहेत. पावसाचा जोर वाढत असल्याने पाण्याची आवकही वाढली आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने कोयना नदीवरील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. शुक्रवारी सकाळपासून धरणाचे दरवाजे साडे चार फुटांवर स्थिर ठेवण्यात आले आहेत.