सातारा - जिल्ह्यातील वाठोरी घाटात एका कारमध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला होता. मात्र, या दुर्घटनेला आता वेगळेच वळण लागले असून त्यातून धक्कादायक खुलासा समोर आला आहे. दीड कोटीच्या विम्यासाठी तसेच मुंबईतील व्यवसायात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी सुमित मोरे (वय 30 वर्षे रा. महिमानगड, ता. माण) याने स्वत:च्या खुनाचा बनाव रचून आपला जीवलग मित्र तानाजी आवळे (वय 28 वर्षे, रा. उकिर्डे ता.माण) याचा खून केल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, वाठार स्टेशन जवळील बोधेवाडी घाटात 21 जानेवारी रोजी चारचाकीसह अर्धवट जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह पोलिसांना सापडला होता. त्यानंतर वाठार पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, वाठार, वडूज, पुसेगाव व लोणंद पोलिसांनी संयुक्तिक तपास करुन या खुनाचे गुढ उकलले.
हेही वाचा - 'स्विगी'चा 'डिलिव्हरी बाॅय' निघाला चोरटा; साताऱ्यातील ४० घरफोड्यांची कबुली
स्वत:च्या खुनाचा बनाव करुन सुमित मोरे याने आपल्या मित्राचा घात केल्याचे पुढे आले. संशयिताने त्याच्या गावातील तानाजी आवळे या तरुणाचा खून करून मृतदेहाला स्वत:चे कपडे घातले होते. तसेच खून केलेल्या तरुणाची ओळख पटू नये, म्हणून चेहऱ्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचाही प्रयत्न केला. तसेच स्वत: मृत झाल्याचा बनाव ठळक करण्यासाठी स्वतःची गाडीही मृतदेहासोबत जाळली होती. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाचा छडा मोठ्या कौशल्याने लावत सुमित मोरे याला या प्रकरणी अटक केली आहे.
हेही वाचा - प्रजासत्ताकदिनानिमित्त कराडात देशभक्तीपर समूह गीत-गायन स्पर्धेला प्रारंभ
तपासावेळी पोलिसांना सुमितच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर हावभाव त्यांचे नातेवाईक यांच्या चेहऱ्यावर पोलिसांना दु:ख दिसत नव्हते. सर्व जण तणावात असल्याचे दाखवत असल्याचे दिसून आले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड यांच्या नजरेतून ही बाब सुटली नाही. भावाकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. चौकशीत तो गडबडला आणि पोलिसांपुढे सर्व हकीकत सांगितली. सुमित हा जेजुरी येथे असल्याचे त्याने सांगितले. तसेच तांत्रिक व गोपनीय तपासाच्या आधारे सुमित जिवंत असल्याचा शोधून काढले. मृतदेह सुमितचा नसल्याचे पोलिसांनी शोध घेऊन त्याला अटक केली. त्यातून स्वत:च्या खुनाचा बनाव उघड झाला आहे.
तानाजी आवळे हा टेलरिंगचा व्यवसाय करत होता. त्याच्या पश्चात पत्नी माधुरी तानाजी आवळे, चार वर्षाचा मुलगा अभिमन्यू आवळे, आई, वडील व भाऊ, असा कुटुंब त्याच्या मागे आहे. अभिमन्यू आवळे हा दिव्यांग आहे.
हेही वाचा - अडीच एकरातील ऊस जळून खाक; अज्ञातांनी आग लावल्याचा संशय