कराड (सातारा) - पाटण तालुक्यातील मोरेवाडी गावात कोंबडीच्या अंड्यातून चक्क चार पायांचे पिल्लू जन्माला आले आहे. त्यामुळे ढेबेवाडी खोर्यात हा कुहुतूलाचा आणि चर्चेचा विषय बनला आहे. पिल्लांबरोबर इकडून-तिकडे पळणारे हे चार पायाचे पिल्लू सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अनुवंशिक दोषामुळे असे घडू शकते. तसेच हा दुर्मिळातील दुर्मिळ प्रकार असल्याचेही पशुवैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले.
अनुवंशिक दोषातून घडला असेल प्रकार -
मोरेवाडी (ता. पाटण) येथील वसंत विठ्ठल मोरे यांच्याकडे अनेक गावठी कोंबड्या आहेत. तीन आठवड्यांपूर्वी त्यांनी 13 अंडी कोंबडीखाली उबवत ठेवली होती. त्या अंड्यांमधून पिल्ले बाहेर येण्यास सुरुवात झाली. एका अंड्यातून चक्क चार पायाचे पिल्लू जन्माला आल्याचे पाहून मोरे कुटुंबिय आश्चर्यचकित झाले. ही बातमी गावात आणि परिसरात वार्यासारखी पसरली आणि कुहुतूलापोटी चार पायाचे पिल्लू पाहण्यासाठी गर्दी होऊ लागली. या पिल्लाला पुढे दोन आणि पाठीमागे दोन, असे चार पाय आहेत. इतर पिल्लांबरोबर हे पिल्लू धावत आहे. अनुवंशिक दोषातून हा प्रकार घडला असून ती एक दुर्मिळातील दुर्मिळ घटना असल्याचे सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. दिनकर बोर्डे आणि निवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजीराव पाटील यांनी सांगितले. कोंबडीच्या पिल्लाचे चारही पाय सुस्थितीत असले आणि पिल्लू चालून-फिरून असेल, तर ते मोठेही होऊ शकते. यापूर्वीही अशा घटना घडलेल्या असल्याचेही ते म्हणाले.
हेही वाचा - पुद्दुचेरी विधानसभा निवडणूक काँग्रेस आणि डीएमके एकत्र लढणार