सातारा - काही दिवसांपूर्वी मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिमंडळातील उपसमितीच्या बैठकीत राज्यात दुष्काळी भागात शेळ्यांसाठी चारा छावणी सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जनावरांसाठी चारा छावण्या सुरू झाल्या. मात्र, शेळ्या-मेंढ्या चारा छावण्या पाऊस पडल्यावर सुरू होणार का? की कागदावर राहणार? असा संतप्त सवाल माणदेशी मेंढपाळ विचारत आहे.
जिल्ह्यात ४ तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर होऊन नऊ ते दहा महिने उलटले. मात्र, आजदेखील या भागात प्रशासनाचे लक्ष नसल्याचे समोर येत आहे. राज्यात भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे.
दुष्काळ जाहीर झाल्यानंतर २५ जानेवारीला जनावरांच्या चारा छावण्या सुरू करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली होती. या चारा छावण्या सुरू होण्यासाठी शेतकऱ्यांना एप्रिल महिन्याची वाट पाहावी लागली. दुष्काळी तालुक्यांमध्ये सध्या भीषण परिस्थिती आहे. त्यातच मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्यास विलंब होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे फलटण, माण-खटाव, कोरेगाव या तालुक्यात पाणीटंचाई आहे. माणदेशातील मेंढपाळ स्थलांतराच्या मार्गावरती आला आहे. आपल्या शेळ्या-मेंढ्या घेऊन सध्या जनावरांच्या चारा छावणीच्या आधाराला येताना दिसत आहेत.
माळरानावरती खुरटे गवत चारा मिळण्याची भूक शमवण्याचा प्रयत्न करत आहेत. शासनाने शेळ्या मेंढ्यांसाठी चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय दिलासा देणारा असला, तरी तो अमलात कसा येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नाहीतर निकष पूर्ण करताना छावणी चालक मेटाकुटीला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नियम व अटी शिथिल करून घेण्यासाठी तत्काळ चारा छावण्या सुरू कराव्यात आणि मेंढपाळांना दिलासा द्यावा, असे मत माणदेशी मेंढपाळ व्यक्त करीत आहेत.