सातारा: शेवरी-राणंद येथील वनाला बुधवारी दुपारी आग लागून मोठे नुकसान झाले. या आगीत सुमारे चार किलोमीटर अंतरातील परिसर बेचिराख झाला. दुपारी उशिरा लोकांना ही आग विझवण्यात यश आले. वन विभागाचे कर्मचारी नेहमीप्रमाणे घटनास्थळी उशिराच पोहचले. मागील आठ दिवसात माण वन विभागाच्या हद्दीत आग लागण्याची ही चौथी घटना आहे.
शेवरी-राणंद गावालगतच्या वन विभागाच्या हद्दीत बुधवारी सकाळी साडे अकराच्या दरम्यान आग लागली. ही बाब लक्षात आल्यावर परिसरातील लोकांनी ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. मात्र, वाऱ्यामुळे आग मोठ्या प्रमाणात वाढत गेली व आटोक्यात आणण्यासाठी लोकांना धावपळ करावी लागली. झाडांच्या डहाळ्यांच्या सहाय्याने नागरिकांनी आग ही आग विझवली. आग आटोक्यात आल्यानंतर वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. मात्र, तोपर्यंत चार ते पाच किलोमीटर अंतरावरील वनसंपदा जाळून खाक झाली होती.
वन विभागाच्या हद्दीत आग लागण्याची गेल्या आठ दिवसांतील ही चौथी घटना आहे. यापूर्वी दहिवडी-गोंदवले हद्दीत, किरकसाल हद्दीत तसेच दहिवडी-फलटण रस्त्यालगत आग लागली होती. या चारी ठिकाणी काही दिवसांपूर्वी वृक्ष लागवड करण्यात आली होती. परंतु यामध्ये संबंधित विभागाकडून भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप ग्राहक प्रबोधन समितीचे तालुकाध्यक्ष राजू मुळीक यांनी केला आहे. वन विभागाच्या हद्दीत वारंवार आग लागतेच कशी? असा प्रश्न उपस्थित करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी राजू मुळीक यांनी केली आहे.