कराड (सातारा) - लॉकडाऊनमध्ये मॉर्निंग वॉकला जाणे कराडकरांना चांगलेच महागात पडले. कराड शहर पोलिसांनी तब्बल 48 जणांवर संचारबंदीचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कराडमधील विविध ठिकाणी मॉर्निंग वॉक करणार्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
संचारबंदीच्या काळात रस्त्यावर न फिरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तरीही लोक मोठ्या संख्येने विनाकारण घराबाहेर पडताना दिसत आहेत. गेल्या आठ दिवसांत कराडमधील कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. शहरातील प्रत्येक पेठेत कोरोनाचे रूग्ण आहेत. तरीही नागरीक थातूरमातूर कारणे सांगून रस्त्यांवर फिरत आहेत. या संदर्भात पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला होता.कराड शहर पोलिसांनी गुरूवारी विनाकारण फिरणार्यांची कोल्हापूर नाक्यावर कोरोना टेस्ट केली. तसेच शुक्रवारी (आज) पहाटे मॉर्निंग वॉकला जाणार्या ठिकाणांवर लक्ष ठेऊन तब्बल 48 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापुढेही पोलीस कारवाई सुरू ठेवणार आहेत. त्यामुळे कराडकरांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी केले आहे.