सातारा - येथील गोडोली भागात एका महाविद्यालयासमोर तरुणींच्या दोन गटांत धुमश्चक्री उडाली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याची दखल घेत पालकांना बोलावून समज दिली आहे.
निर्भया पथकाकडून दखल
गोडोली भागात एका महाविद्यालयासमोर दोन दिवसांपूर्वी तरुणींच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. याचवेळी याचा व्हिडिओ काही मुलींनी आपल्या मोबाइलमध्ये कैद केला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याची निर्भया पथकातील महिला पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित युवतींना पालकांसह बोलावून घेतले. नेमकी कोणत्या कारणातून ही वादावादी झाली, याची माहिती घेतल्यानंतर त्यांना समज देण्यात आली. यापुढे जर वाद झाला तर कारवाईची तंबी त्यांना देण्यात आली आहे.
दोन व्हिडिओ व्हायरल
या धुमश्चक्रीचे एकूण दोन व्हिडिओ व्हायरल झालेत. व्हिडिओमधील दोन मुलींनी गत आठवड्यातही एका मुलीला मारहाण केली होती. याचा व्हिडिओही व्हायरल झाला असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले. काही मुलींनी व्हॉट्सॲपला हा वादावादीचा व्हिडिओ स्टेट्स म्हणून ठेवला होता. साता-यात याची मोठी चर्चा आहे.