सातारा - शहराबरोबरच तालुक्यांतील मोठ्या गावांमध्ये अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. मात्र, अशा व्यावसायिकांवर अन्न व औषध प्रशासनाची कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. दहिवडी, वडूज, फलटण पालिका हद्दीत त्याचबरोबर तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये अनेक किराणा व्यापारी अधिकचा नफा मिळवण्यासाठी गुटखा, मावा तसेच अमलीपदार्थ विक्री करत आहेत. प्रशासन मात्र या शहराकडे ढुंकूनही पाहायला तयार नाही.
सध्या सांगली, कर्नाटक, बेळगाव, कोल्हापूर या ठिकाणी पाऊस असून वाहतूक व्यवस्था पूर्ण ठप्प झाली आहे. त्यामुळे अवैधरित्या येणारा माल पोहोचत नसल्याने दुकानदारांनी या अवैध धंद्याचे दर दुप्पट केले आहेत. राज्यात गुटखा, मावा विक्रीला पूर्ण बंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष धक्कादायक असल्याचे बोलले जात आहे. तालुक्यात पाण्याच्या बाटली पासून थंड पेयापर्यंत सगळा माल नकली असून तो आरोग्याला घातक असतानाही विकला जात आहे. मात्र यावर निर्बंध आणणारी यंत्रणा मूग गिळून गप्प का आहे, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
आठ दिवसांपुर्वी अन्न व्यवसाय परवाना मिळवून देण्यासाठी लाच स्वीकारताना वर्ग 1 चे अधिकारी शिवकुमार बाबुराव कोडगिरे यांना अटक करण्यात आली होती. तसेच त्यांच्या सातारा, पुणे येथील घरा वरती धाडी टाकून मोठी रक्कम देखील जप्त करण्यात आली होती. अवैध धंदे बोकाळण्यामध्ये कुठेतरी प्रशासनातील अधिकाऱ्यांचाच हात असल्याचे या घटनेतून दिसून येते.