सातारा - "बाबा.. सावकार आलायं.. मला भ्यावं वाटतयं" या आर्त हाकांनी बापासह संपूर्ण कुटुंबाचे काळीज पिळवटून निघत असून, सावकाराची कमालीची दहशत दुष्काळी भागातील शेतकरी आणि मजुरांच्या घरामध्ये पसरत आली आहे. सावकाराच्या जाचाला कंटाळून अनेक कुटुंबातील सदस्यांना आता जगणे असह्य झाले आहे.
हेही वाचा - 'कीर्तनातून 'निवृत्ती'? आता फेटा उतरवून करणार 'शेती'
दुष्काळी खटाव, माण, कोरेगाव, फलटण, पाटण या पट्ट्यात कमी पाऊस आणि कर्जबाजारीपणा हे समीकरणच बनले आहे. सावकारांकडून कर्ज घेणारे शेतकरी, मजूर, यासह हातावरची पोटे असणारी छोटे व्यावसायिक सावकाराच्या पाशाने मेटकुटीला आले आहेत. सावकार अवाजवी व्याजाच्या रक्कमेच्या वसुलीसाठी घरी येताच घरातील महिला, अबाल वृद्ध, लहान मुले यांच्या मध्ये भीतीचा कंप दाटत आहे. हिंदी सिनेमातील व्हिलनप्रमाणे सुटाबुटात, गळ्यात चैन, मनगटात ब्रेसलेट, डोळ्यावर गॉगलसह सोबत गुंडाची टोळी अशा अवस्थेत वसुलीसाठी ग्रामीण भागात आलिशान गाड्यांचा ताफा घरात घुसून दहशत निर्माण करणे हे नित्याचेच झाले आहे. असे असले तरी हे आता भयावय झाले आहे.
दुष्काळी भागात वडिलांना कामात मदत करून शाळेत जाणाऱ्या चिमुरड्यालासुद्धा शाळेत गेल्यानंतर मागे सावकार घरी आला नसेल ना या भीतीने ग्रासलेले असते. थकलेल्या घरातील वृद्ध दारात बसले असताना सावकार येणार नाही ना या भीतीने काळजाला कायम कंप सुटलेला असतो. कामावर गेल्याल्या घरातील महिलेला सावकाराच्या भीतीने कायम हृदय हदरलेले असते. मन पिळवटून टाकणाऱ्या दुष्काळी तालुक्यात सध्या सावकारांमुळे अनेक गोरगरीब कुटूंबे भीतीच्या छत्रछायेखाली असून, माय बाप सरकारने या कुटुंबाला बाहेर काढण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न करणे गरजेचे आहे.
"म्या घरी नाय म्हणून सांग"
वसुलीसाठी गुंडाचा ताफा ठरलेल्या तारखेला घरी येणार. कुटूंबासमोर शिवीगाळ, मारहाण, होणार या भीतीने कुटुंबातील कर्ता बाकीच्या सदस्याना म्या घरात नाय असा निरोप धाडत असतो. "आय आपण मामाच्या गावाला राहायला जायचं का? आय सावकार आले की, मला लय भ्याव वाटतं." या काळीज पिळवटून टाकणाऱ्या लेकराच्या बोलण्याने त्याची आई सुद्धा निशब्द होत आहे.
हेही वाचा - 'मी माझ्या पक्षावर कधीही टीका केली नाही, पक्ष आणि मी एकरूप'