सातारा - महाड दुर्घटनेनंतर बोध घेत सरकारने डोंगराच्या पायथ्याशी होणाऱ्या विकासकामांना आळा बसवावा आणि येथे राहणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन करावे, अशी चर्चा राज्यभरात सुरू आहे. याच पार्श्वभूमिवर साताऱ्यातील यवतेश्वर डोंगर रांगेच्या पायथ्याची राहणाऱ्या पाचशे कुटुंबावर अशी वेळ येऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
तज्ज्ञांचा सावधानतेचा इशारा -
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात अतिवृष्टीमुळे डोंगर खचून मानवी वस्तीत हाहाकार उडाल्याच्या घटना ताज्या आहेत. अजिंक्यतारा आणि यवतेश्वर डोंगराच्या पायथ्याला अनेक वस्ती आहेत. यातील काही अधिकृत तर काही अनधिकृत आहेत. मात्र, या वस्ती डोंगराच्या तीव्र उतारावर असल्यामुळे दगड-धोंडा निसटला, तर मोठी जीवित व वित्तहानी होऊ शकते, अशी शक्यता भूगर्भ तज्ञांनी व्यक्त केली आहे. तसेच जमिनीखाली झिजलेल्या आणि न झिजलेल्या खडकांच्या स्तरांमधील पोकळीत पावसाचे पाणी शिरल्यास भूस्खलन होते. तीव्र उतार आणि जास्त पाऊस असेल, तर जमिनीत मुरलेले पाणी कठीण खडकाच्या पृष्ठभागावरून वाहते. तसेच उतारामुळे घसरणीचा वेग वाढतो. एखादी वसाहत गाडण्याचे काम हे भूस्खलन करते, अशी माहिती निवृत्त प्राध्यापक एम.के.गरुड यांनी दिली. काही ठिकाणी सुरक्षिततेसाठी रिटेनिंग वॉल बांधल्या जातात. मानवनिर्मित अडथळे अशा दुर्घटनांची परिणामकारकता काही प्रमाणात कमी करतील; परंतु ते पुरेसे ठरणार नाही. आपल्याला अजिंक्यताऱ्याच्या रचनेचा अभ्यास करावा लागेल आणि त्यापासून सुरक्षित अंतर ठेवूनच वसाहत निर्माण कराव्या लागतील, असेही प्रा. गरुड यांनी सुचवले.
'या पट्ट्यातील पायथ्याच्या घरांना भविष्यात धोका संभवतो' -
साताऱ्यात डोंगर उतारावरील विकसन हे अशास्त्रीय व बेकायदेशीर असल्याचे मत मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे यांनी व्यक्त केले. विकासाच्या नावाखाली यांत्रिक खोदकामाच्या हादऱ्यामुळे जमिनीची पकड ढिली पडते. उघड्या पडलेल्या जमिनीत पाणी मुरले की उताराच्या बाजूस घसरण सुरू होते. चार भींती ते पॉवर हाऊस या पट्ट्यातील पायथ्याच्या घरांना भविष्यात धोका संभवतो, असा इशाराही सुनील भोईटे यांनी दिला. गेल्या कित्येक वर्षांपासून डोंगरात अतिक्रमण करून वसाहती सुरु आहेत. प्रशासन येथे एखाद्या दुर्घटनेची वाट पाहत का?, असा प्रश्न 'ड्रोंगो' या निसर्ग संवर्धन व संरक्षण संस्थेचे अध्यक्ष सुधीर सुकाळे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना उपस्थित केला.
हेही वाचा - VIDEO : हिमाचल प्रदेशमधील भूस्खलनाचा थरारक व्हिडिओ; पूल चक्काचूर, 9 पर्यटकांचा मृत्यू