सातारा - देशाचा सैनिक हा सिमेवर लढत असतो तर इकडे कुटुंबात त्याची पत्नी प्रापंचिक पातळीवर लढत आपल्या संसाराला हातभार लावत असते. त्याचीच प्रचिती देत सातारा जिल्ह्यातील माजी सैनिक व विधवा सैनिक पत्नी यांच्या १७ बचत गटांनी पारंपरिक व्यवसाय सोडून १७ बसेस खरेदी करत 'ट्रान्सपोर्ट' व्यवसायात पाऊल टाकले आहे. या सर्व बसेस पुणे महानगर परिवहन महामंडळाशी (पीएमपीएमएल) करारबद्ध झाल्या आहेत.
राज्यातील हा पहिलाच उपक्रम
काळाच्या बदलत्या प्रवाहात महिला आता कोणत्याच क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीत. देशाची सेवा करणाऱ्या सैनिकांच्या पत्नींनीही असाच आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून ही किमया साधली आहे. भरतगाववाडी (ता. सातारा) येथील माजी सैनिक व पंचायत समितीचे माजी उपसभापती सूर्यकांत पडवळ यांनी या अनोख्या उपक्रमाची माहिती दिली. सातारा जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या व सैनिकांच्या विधवा पत्नी यांच्या १७ बचत गटांतील सुमारे १९० महिलांनी या उपक्रमासाठी योगदान दिले आहे. कुरड्या, पापड, लोणची अशा चाकोरीबद्ध व्यवसायात न अडकता त्या पलिकडचा विचार करून या महिलांचे बचतगट ट्रान्सपोर्ट व्यवसायात उतरले आहेत.
राज्यात अशा ४० बसेस
राज्यातील माजी सैनिकांच्या पत्नी व विधवा सैनिक पत्नी यांच्या बचत गटांत ६०० हून अधिक महिलांचा समावेश आहे. हे बचतगट साताऱ्यासह पुणे, सांगली, कोल्हापूर, नगर, वाशीम जिल्ह्यात कार्यरत आहेत. या बचत गटांतील महिलांनी ४० हून अधिक बस खरेदी केल्या आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील १७ बसेसचा समावेश आहे. या गटातील महिलांनी काही प्रमाणात स्वनिधी उभा केला. त्यांना अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ, सैनिक कल्याण बोर्ड यांचे सहाय्य तसेच बँक ऑफ महाराष्ट्रने अर्थपुरवठा केला आहे. त्यापुढे जात या बस 'पीएमपीएमएल'ला ७ अधिक ३ अशा १० वर्षांच्या भाडेतत्त्वावर पुरविल्या जाणार असल्याचे सूर्यकांत पडवळ यांनी सांगितले.
साताऱ्याजवळ लोकार्पण सोहळा
या बसचा लोकार्पण कार्यक्रम भरतगाववाडी (ता. सातारा) येथे झाला. महाराष्ट्र राज्याचे सैनिक कल्याण विभागाचे कर्नल आर. आर. जाधव, जिल्हा सैनिक कल्याण विभाग साताराचे कमांडर व्ही. बी. पाटील, बँक ऑफ महाराष्ट्राचे झोनल अधिकारी सुमित कुमार, जिल्हा सैनिक अधिकारी सुभेदार विलास घाडगे, नागठाणेचे शाखाधिकारी श्री.सोनावणे, माजी पंचायत समिती उपसभापती सूर्यकांत पडवळ, सुभेदार रमेश वाघ आदींच्या उपस्थित हा कार्यक्रम झाला.
जिल्ह्यातील १७ बसचा समावेश
या उपक्रमात जिल्ह्यातील बचत गटांचा मोठा सहभाग आहे. सातारा तालुक्यातील भरतगाववाडी ३, खिंडवाडी ३, सातारा शहर २, चिंचणेर २, संभाजीनगर १, पाडळी १, शिवथर १, जैतापूर, अंगापूर १ व चिखली- मसूर (ता. कराड) अशा एकूण १७ बसचा समावेश आहे.
सबलीकरणासाठी हा उपक्रम - पडवळ
विश्वयोद्धा मल्टिट्रेड प्रा. लि मार्फत या सर्व बसेस 'पीएमपीएमएल'शी करारबद्ध केल्या गेल्या आहेत. माजी सैनिक पत्नी व विधवा सैनिक पत्नींच्या आर्थिक उन्नती व सबलीकरणासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. भविष्यात या बससेसचे उत्पन्न त्या-त्या बचत गटाच्या खात्यावर जमा होणार असून त्याचा लाभ या सहभागी सर्व माता-भगिनींना होणार आहे. लवकरच या उपक्रमाची व्याप्ती वाढवणार असल्याचे सूर्यकांत पडवळ यांनी सांगितले.