सातारा - माण-खटाव, कृष्णा आणि कोयना नद्यांचे पावसाळ्यातील पूराचे वाहून जाणारे पाणी पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाला देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वर्ल्ड आणि एशियन डेव्हलपमेंट बॅंकेच्या आंतरराष्ट्रीय तज्ञांच्या समूहाने डायव्हर्जन कॅनॉल आणि टनेलच्या माध्यमातून दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी सर्वेक्षण हाती घेतले असून पुढील पाच वर्षात दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवून राज्यातील शेतकऱ्यांना सुजलाम् सुफलाम् करणार असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच माण-खटावचे विकासपुरुष जयकुमार गोरे यांना जिल्ह्यातून सर्वाधिक मतांनी निवडून दिल्यास सातारा जिल्ह्याला जयकुमार यांच्या माध्यमातून एक मंत्री पद देऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - उमेदवार संत असला पाहिजे म्हणून सुधाकरपंतांना उमेदवारी - देवेंद्र फडणवीस
म्हसवड येथे माजी आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रचारार्थ आयोजित महाजनादेश संकल्पसभेला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, रयतक्रांतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा - सरकारचा पीएमसीमध्ये थेट हस्तक्षेप नाही - निर्मला सीतारामन
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, सध्या सुरु असलेल्या निवडणूक रणधुमाळीत आम्हाला मजाच येत नाही. आमच्या समोर तुल्यबळ कुणीच नाही. 2 वर्षाचे पोरगे पण म्हणत आहे की, सरकार भाजपचेच येणार आहे. आमचे सर्व पैलवान तेल लाऊन तयार आहेत. समोर लढाईला पैलवानच नाही. राहुल गांधींनाही महाराष्ट्रात आमचेच सरकार येणार असल्याचे माहीत असल्याने त्यांनी परदेशात पळ काढला आहे. पवार आणि राष्ट्रवादीची अवस्था आधे इधर, आधे उधर आणि बाकी मेरे पीछे अशी झाली आहे. जयकुमार गोरेंनी तर माण-खटावमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीला चिन्हावर लढायला माणूसच ठेवला नाही. गोरे लढवय्या आहेत. त्यांचा जिहेकठापूर योजनेसाठीचा एकट्याने केलेला संघर्ष मी पाहिला आहे. त्यासंबंधीची मागणी मान्य होईपर्यंत त्यांनी सभागृह चालू दिले नव्हते.
हेही वाचा - महिला मुख्यमंत्री म्हणून पंकजाताईंशिवाय दुसरी सक्षम महिला दिसत नाही - प्रीतम मुंडे
मोठ्या संघर्षातून जयकुमार गोरेंचे नेतृत्व उभे राहिले आहे. त्यांच्यावर अगोदरपासूनच आमचा डोळा होता. हिरा पारखण्याची नजर आहे. त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे माढ्याचा लोकसभेचा गड जिंकला. जयकुमार बरोबर असल्यावर ते होणारच होते. त्यांनी फक्त 64 गावांना पाणी देण्याची मागणी केली. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच जिहेकठापूरच्या वाढीव योजनेला 5 दिवसात मान्यता देऊन पुढच्या 3 दिवसात कामाचे टेंडरही काढले.
हेही वाचा - ६ टक्के मुस्लिमांनी मोदींना मत दिले, '६'ला 'क्रिकेटमध्ये छक्का' म्हणतात - ओवेसी
दुष्काळी जनतेला पाणी दिले तर ते त्या पाण्याचे सोने करतील, असा विश्वास जयकुमारांनी दिला आहे. उरमोडीचे पाणी अर्ध्या मतदारसंघाला दिले आहे. आणखी ६४ गावांचा पाणीप्रश्न सोडवला आहे. या गावांना 2 वर्षात पाणी देणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बारामतीला पाणी पळवल्यामुळेच जिल्ह्यातील हा भाग पाण्यापासून वंचित राहिला. दुष्काळाची राजधानी बनलेले पश्चिम महाराष्ट्रातील तालुके पुढील 5 वर्षात दुष्काळग्रस्त राहू देणार नाही, असे विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा - शून्य शून्याकडे गेला तरी शून्यच, आशिष शेलारांचा राष्ट्रवादीसह मनसेला टोला
शेतकऱ्यांना आम्ही 5 वर्षात 50 हजार कोटींची थेट मदत केली. 30 हजार कोटींचे आणि 50 वर्षे टिकणारे रस्ते तयार केले आहेत. 18 हजार गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना आम्ही पूर्ण केल्या आहेत. महाराष्ट्राचे सकल उत्पन्न 16 लाख कोटींवरुन 26 लाख कोटींवर नेण्यात आम्हाला यश आले आहे. गुंतवणूक, रोजगार आणि उद्योगात राज्याला 1 नंबरवर आम्ही नेले असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
...असे मुख्यमंत्री पाहिलेच नाहीत - जयकुमार गोरे
विकासकामांबाबतीत मी ज्या मागण्या मुख्यमंत्र्यांकडे केल्या त्या सर्व मागण्या त्यांनी पूर्ण केल्या. 64 गावांच्या दोन पाणीयोजना, एमआयडीसी आणि आता केलेली मतदारसंघातून रेल्वे नेण्याची मागणी त्यांनी तात्काळ मान्य केली आहे. जनतेच्या कामासाठी वाट्टेल तितके परिश्रम घेणारे मुख्यमंत्री माझ्या पाठीशी आहेत. इतिहासात पहिल्यांदाच लवादाचा निर्णय बदलू फेरपाणीवाटप करण्याचे आदेश देणारे, कर्जमाफी, मराठा आरक्षणासारखे धडक निर्णय घेणारे मुख्यमंत्री माण-खटावचा कायापालट करणार असल्याचा विश्वास जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.