कराड (सातारा) - माजी आमदार आनंदराव पाटील यांनी विधान परिषदेच्या कार्यकाळातील अखेरच्या टप्प्यात आपल्या आमदार निधीतून 20 लाखांची तरतूद केली आहे. यामाध्यमातून त्यांनी कराड तालुक्यातील ग्रामपंचायती, कोविडवर उपचार करणारी रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शैक्षणिक संस्थांना कोविड किटचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यासह मान्यवरांनी कौतुक केले.
गेले वर्षभर प्रशासन कोरोनाशी सामना करत आहे. आता कोरोनाचा दुसरा टप्पा सुरू झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार आनंदराव पाटील यांनी कराड तालुक्यातील ग्रामपंचायती, रुग्णालये, शैक्षणिक संस्थांना सॅनिटायझर मशिन, पीपीई किट, ऑक्सिमीटर, मास्क अशा किटचे कोविड किटचे वाटप केले. जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, कृष्णा बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, जयंत पाटील, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, बाजार समितीचे संचालक सुनील पाटील, प्रतापसिंह पाटील यांच्या उपस्थितीत सुरक्षित अंतर ठेवून हा कार्यक्रम पार पडला.
काय म्हणाले आनंदराव पाटील?
सामाजिक बांधिलकी आणि शेवटच्या माणसापर्यंत आपल्या निधीचा उपयोग व्हावा, यासाठी हा उपक्रम राबवल्याचे माजी आमदार आनंदराव पाटील म्हणाले. पहिल्या टप्प्यात जनतेने खूप काही भोगले आहे. दुसऱ्या टप्प्यात लोकांचा त्रास कमी व्हावा, यासाठी कोविड किटसाठी अखेरच्या वर्षात आपण 20 लाखांच्या निधीची तरतूद करण्यास प्राधान्य दिल्याचे आनंदराव पाटील यांनी सांगितले. यावेळी कराड नगरपालिकेचे आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, सामाजिक कार्यकर्ते सलीम मुजावर यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.
हेही वाचा - खासदार श्रीनिवास पाटील यांनी संसदेत मांडल्या जिल्ह्यातील समस्या
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन -
गेली वर्षभर लॉकडाऊनच्या काळात आम्ही जे निर्णय घेतले, त्यास लोकांनी सहकार्य केले. जत्रा, यात्रा वर्षभर बंद आहेत. तरीही लोकांनी समजून घेतले. आता पुन्हा रूग्णवाढ होऊ लागली असताना लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्राम दक्षता समित्या पुन्हा सक्रिय केल्या असून या समित्यांनी गावपातळीवर संसर्ग रोखण्यासाठी दुप्पट वेगाने काम करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
कोरोनाच्या दुसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार आनंदराव पाटील यांनी कोविड किट वाटपाचा घेतलेला कार्यक्रम महत्वाचा आहे. कोरोना विरोधातील लढ्याला त्यामुळे बळ मिळेल. गेली वर्षभर दिवसरात्र पोलीस रस्त्यावर आहेत. लोकांना दंड करण्याची पोलिसांची मानसिकता नसते. मात्र, लोकांनी नियम, निर्बंधांचे पालन केले पाहिजे, असे आवाहन पोलीस अधीक्षक बन्सल यांनी केले. आनंदराव पाटील यांनी ग्रामपंचायती, रूग्णालये आणि कोविड योद्ध्यांना पाठबळ दिले असल्याचे सांगून डॉ. अतुल भोसले यांनी दुसर्या टप्प्यातील कोरोनाशी लढण्यासाठी देखील कृष्णा रुग्णालय सज्ज असल्याचे सांगितले.
हेही वाचा - आश्चर्य! आईने घेतली लस तर कोरोना अँटीबॉडीजसह बाळाचा जन्म