सातारा- समाज माध्यमावर धनगर समाजाच्या भावना दुखावणारे भाष्य करणाऱ्या समाजकंटकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सकल धनगर समाज यांच्या वतीने करण्यात आली आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी खासदार शरद पवार यांच्या बद्दल केलेल्या टीकेविरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलने करण्यात आली. ही आंदोलने करताना काही जणांनी धनगर समाजाला लक्ष्य केले. धनगर समाजातील काहींनी आमदार पडळकर यांचे समर्थन करताना मराठा समाजावर निशाणा साधला होता.
याच अनुषंगाने आज माणमधील धनगर समाजाच्या युवकांनी मोर्चाद्वारे दहिवडी पोलिसांना निवेदन दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिपक जाधव, प्रदीप खोब्रागडे, मोईनुद्दीन तांडलीकर, सोपान धुमाळ या व अशा कार्यकर्त्यांनी धनगर समाजाविषयी अपशब्द वापरुन समाजासमाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा पोस्ट समाज माध्यमावर टाकल्या आहेत. त्यामुळे धनगर समाजाच्या भावना दुखावल्या आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.
या समाजकंटकांवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा धनगर समाजाच्यावतीने महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. याची जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी वैभव महानवर, कैलास दडस, राजू मुळीक, एकनाथ वाघमोडे, अमृत चौगुले, सागर कोकरे, सुधीर गलंडे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.