सातारा - भारतीय थोर परंपरेत श्रावण महिना अंत्यत पवित्र मानला जातो. अध्यात्म आणि आरोग्य यांचा जवळचा समन्वय आहे. शिवशंकर पिंडीस पाणी घालणे, बेलफुल, दवणा वाहणे हे महत्वपूर्ण समजले जाते. प्रतिवर्षी श्रावण महिनाभर शिंगणापूर येथे शिवभक्तांची रीघ असते. कारण, श्रावणमासात शिंगणापूरच्या शंभू महादेवाचे दर्शन म्हणजे कोथलगिरी प्रदक्षिणाच मानली जाते.
समुद्रसपाटी पासून सुमारे १०५० इतकी उंची शिंगणापूर डोंगराची आहे. शिंगणापूर डोंगर पायथ्याला कोथळे गाव वसलेले आहे. त्यामुळे या शंभू महादेव डोंगरास कोथलगिरी पर्वत म्हणतात. मुख्य मंदिरात माता पार्वती आणि देवधिदेव शंकर यांचे अस्तित्व आहे असे मानले जाते. १२८० दरम्यान राजा सिंघणं याने हे गाव वसविल्याची आख्यायिका आहे.
काय आहे दंतकथा?
शंकर-पार्वती या ठिकाणी सारीपाट खेळ खेळत असत. एकदा त्यांनी पण लावून खेळ खेळला, जो या खेळात हरेल त्याने सर्वसंग परित्याग करायचा. हे सर्व सोडून निघून जायचे असे ठरले. उत्तररात्री चाललेल्या खेळामध्ये माता पार्वती विजयी झाल्या. त्यामुळे, महादेव जंगलात निघून गेले. दोघांमध्ये विरह निर्माण झाला. मातापर्वतीने महादेवांचा शोध घेण्यास प्रारंभ केला. तेव्हा आठ ठिकाणी महादेवांनी पार्वती मातेला दर्शन दिले. त्याची साक्ष म्हणून आजही शंभू महादेव मुख्य मंदिरा सभोवती अष्ठलिंग आहेत.
दरम्यान, गुप्तलिंग ठिकाणी महादेव-पार्वती भेट झाली. यावेळी सर्व देवांनी त्यांना विनंती केली, आता यापुढे तुम्ही कोठेही जाऊ नका. जो भक्त शिंगणापूर ठिकाणी येईल, बेलफुल देवदर्शन घेईल त्यांचे कल्याण करा. त्या अनुशंगाने शिखर शिंगणापूर येथे चैत्र शुद्ध अष्टमी तिथीस शंकर-पार्वती विवाह सम्पन्न झाला. त्याची साक्ष म्हणून मुख्य मंदिरात दोन लिंगे आहेत. शंकर ही तेज, ज्ञान, वैराग्य, त्याग आणि आनंद देणारी देवता आहे.
गाभाऱ्यातील दोन लिंगे, पाच नंदी, फिरते दगडी खांब, शंभरपाकळी दगडीकमळ, कड्यातील महागणपती, भागीरथी, श्रीबळी राज अमृतेश्वर मंदिर, मुंगीघाट ,भवानी मंदिर इथली वैशिष्ट्ये आहेत. तर श्रावण सरी आणि हलक्या पावसाने हिरवा गार झालेला डोंगर हे विलोभनीय दृश्य, तसेच सभोवतालच्या पर्वतरांगा यांचा आनंद घेत, श्रावण महिन्यातील कोथलगिरी प्रदक्षिणेचा आंनद लुटतात.
श्री शंभू महादेव शिखर देव दर्शन
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात, शिखर शिंगणापूर हे शंभू महादेवाचे मंदिर 'खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले' यांचे खासगी देवस्थान आहे. या ठिकाणी श्रावणात महादेवाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातून लाखो भाविक येतात.