सातारा - धार्मिक भावनेतून पवित्र मानलेल्या उपवनास देवराई म्हणतात. सातारा शहरात असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्याच्या उतारावर मंगळाईच्या नावाने काही युवक अशीच एक देवराई साकारत आहेत. या उपक्रमाचा प्रारंभ मंगळवारी मोठ्या उत्साहात झाला.
१ एकर परिसरात वृक्षारोपण अन् संवर्धन
या उपक्रमाला उपवन संरक्षक महादेव मोहिते, मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे व पर्यावरणप्रेमी नागरिक उपस्थित होते. अजिंक्यतारा किल्ल्याच्या उतारावर, शाहू नगरच्या परिसरात ही देवराई उभारण्यात येत आहे. या कामासाठी तरुणांचा मोठ्याप्रमाणात सहभाग असलेल्या 'दि गार्डनर्स' या समुहाने पुढाकार घेतला आहे. सातारा शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावर वृक्ष संवर्धनाला मोठा वाव आहे. पुर्वेच्या उताराच्या मध्यावर मंगळाई देवीचे मंदीर आहे. या मंदिराजवळ सुमारे १ एकर क्षेत्रात ही देवराई उभारण्यात येत आहे.
स्थानिक प्रजातींची झाडे लावण्याला प्राधान्य
परदेशी झाडांचा पक्षांना उपयोग होत नाही. त्यामुळे वड, उंबर, काटेसावर, कडूनिंब, बेल अशा सारख्या स्थानिक प्रजातींच्या वृक्षांची संगोपन करणार असल्याचे 'दि गार्डनर्स' ग्रुपचे अॅड. ॠषीकेश बहुलेकर यांनी सांगितले. महाराष्ट्रातही सुमारे तीन हजार देवराया आहेत. काळूबाई, रानजाई, भैरोबा, विंझाई, म्हसोबा, सोनजाई, आंबेश्वर अशा अनेक देवतांच्या नावाने त्या ओळखल्या जातात. सातारा जिल्ह्यात काळूबाई, आरव, घाटाई इत्यादी २९ देवरायांची नोंद आहे. याच पद्धतीची देवराई पहिल्या टप्प्यामध्ये छोट्या स्वरुपात मंगळाई मंदीर परिसरात उभारण्यात येत असल्याचे मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे यांनी सांगितले.
काय आहे देवराईची संकल्पना?
धार्मिक भावनेतून पवित्र मानलेले उपवन. जगातील निरनिराळ्या संस्कृती असलेल्या समाजाने पवित्र भावनेतून वृक्षांची वाढ करून ते क्षेत्र सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न या उपक्रमाद्वारे करण्यात आला आहे. समाजाने धार्मिक महत्त्व देऊन राखीव ठेवलेल्या लहानलहान क्षेत्राच्या उपवनास देवराई म्हणतात. देवराई ही वृक्षवाढीसाठी मनुष्याने व्यक्त केलेली कृतज्ञतेची एक भावना आहे. देवराई ही बहुधा देवळाभोवती असते. या देवरांयामध्ये झाडावरचे फूलही निसर्गतःच खाली पडल्याशिवाय देवाला वाहिले जात नाही.
देवराईचे फायदे -
देवरायांच्या परिसरात वृक्षतोड, चराई यांनाही बंदी असते. देवराईतील झाड अथवा ओली फांदी जरी तोडल्यास देवीला ते चालत नाही, अशी ग्रामस्थांची धारणा आहे. त्यामुळे वृक्ष संवर्धन व कु-हाड बंदीला धार्मिक अधिष्ठान आहे. देवराईमुळे मातीची सुपीकता तर वाढतेच, पण जमिनीखालच्या पाण्याचेही संवर्धन होते. या उपक्रमाला कन्हैय्यालाल राजपुरोहित, ड्रोंगोचे अध्यक्ष सुधीर सुकाळे, पंकज नागोरी, दी गार्डनरस् ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा - वर्षाच्या अखेरीस प्रधानमंत्री मोदी अमेरिकेचा दौरा करण्याची शक्यता