सातारा - प्रत्येक जिल्ह्यातील मोठ्या गावात 30 बेडचे रुग्णालय सुरू करावे, असे सांगून येत्या काही दिवसात कोरोना संसर्ग साखळी तुटली पाहिजे, असे नियोजन करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय हॉलमध्ये कोरोना संसर्गाचा अजित पवार यांनी शुक्रवारी आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.
गृह विलगीकरणामुळे संपूर्ण कुटुंब बाधित होत असून सातारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गृह विलगीकरण बंद करुन कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तींचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात यावे, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिल्या.
हेही वाचा - गेल्या वर्षाची जीएसटीची २४ हजार कोटींची भरपाई तातडीने मिळावी - अजित पवार
ऑडिट करण्याच्या सूचना -
कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा 24 तासात शोध लावून त्यांची पहिल्यांदा कोरोना चाचणी करावी. जिल्ह्यात कडक निर्बंध लावले आहेत. तरीही काही नागरिक बाहेर फिरत आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले. शासकीय तसेच खासगी कोविड रुग्णालयांचे ऑक्सिजन, फायर, तसेच इलेक्ट्रिक ऑडिट करा. हे ऑडिट सातत्याने करावे, अशा सूचनाही अजित पवार यांनी केल्या. तसेच साखर कारखान्यांनी ऑक्सिजन प्लांट सुरू करावेत. आमदारांना कोरोना संसर्गाबाबत 1 कोटीपर्यंत निधी खर्च करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यांनी त्यांचा निधी योग्य पद्धतीने खर्च करावा. प्रत्येक नागरिकाला योग्य पद्धतीने उपचार मिळण्यासाठी सरकार निधीची कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.
आरोग्यमंत्री काय म्हणाले?
बंद करण्यात आलेली कोरोना केअर सेंटर्स पुन्हा सुरू करावीत. तेथे रुग्णांची जेवण्याची चांगल्या पध्दतीची व्यवस्था आणि औषधोपचार करण्याचे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत उपचार केलेल्या कोरोना रुग्णांची प्रलंबित प्रकरणे तत्काळ मंजूर केली जातील, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार मकरंद पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, आमदार दीपक चव्हाण, आमदार अरुण लाड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल उपस्थित होते.
हेही वाचा - पुण्यातील विकेंड लॉकडाऊन रद्द; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची घोषणा