सातारा - सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत ( Satara DCC election ) गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई ( Shambhuraj Desai ) व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे ( Shashikant Shinde ) यांना पराभवाला सामोरे जावे लागले. शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला.
केवळ 1 मताने पराभव -
पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाच्या सातारा जिल्हा बँकेच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे जाणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. अशातच साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला. शिंदेंविरोधात उभे असलेल्या ज्ञानदेव रांजणे यांचा विजय झाला आहे. शशिकांत शिंदे यांनी 24 मते मिळाली असून विजयी उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांना 25 मते मिळाली आहेत.
10 जागांसाठी झाले मतदान -
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत 96 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. 21 जागांसाठी ही लढत असताना यातील 11 जागा या बिनविरोध झाल्या होत्या. मात्र उर्वरीत दहा जागांसाठी झालेल्या मतदानावेळी अनेक मतदान केंद्रावर हायहोल्टेज ड्रामा पहायला मिळाला. यात माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्या होम पिचवरच त्यांच्या विरोधात त्यांचाच कार्यकर्ते असलेले ज्ञानेश्वर रांजणे हे निवडणूकीच्या रिंगणात उभे होते.
शंभूराज देसाईंचाही पराभव -
पाटण प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघातून महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा सत्यजितसिंह पाटणकर यांनी पराभव केला. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे ते सुपूत्र आहेत. शंभूराज यांना 44 तर सत्यजितसिंह यांना 58 मते मिळाली.
पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची मात
कराड प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघातील निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. येथील लढत पालकमंत्री बाळासाहेब पाटील विरुद्ध माजी मंत्री दिवंगत विलासराव पाटील-उंडाळकर यांचे सुपूत्र उदयसिंह पाटील यांच्यात झाली. येथून बाळासाहेब पाटील हे 74 इतकी मते घेऊन विजयी झाले असून त्यांनी उदयसिंह पाटील यांचा 8 मतांनी पराभव केला आहे.
हेही वाचा - सातारा जिल्हा बँक निवडणूक : कराडमध्ये शंभर टक्के मतदान, पाटणमध्ये चुरस