सातारा - सातार्यातील तालीम संघाच्या परिसरातील एका बंद घरात हात-पाय बांधलेल्या स्थितीतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिल्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी अणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. संदीप दबडे, असे मृताचे नाव असून प्रथमदर्शनी ही खुनाची घटना असल्याची बाब समोर आली आहे.
घरातील दुर्गंधीमुळे घटना उघडकीस - तालीम संघ परिसरातील एका घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजारील नागरिकांनी सातारा शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घराचा दरवाजा उघडला असता आत मृतदेह आढळून आला. मृत व्यक्तीचे हातपाय बांधलेले होते, त्यामुळे प्रथमदर्शनी ही खुनाची घटना असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे तालीम संघाच्या परिसरात खळबळ उडाली.
खुनाच्या अनुषंगाने तपास सुरू - पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात नेला आहे. खून नेमका कोणी आणि का केला? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. बंद घरात मृतदेह आढळल्यानंतर नागरिकांची घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. सातारा शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
हेही वाचा - Human Trafficking : अनैतिक व्यापारातील मानवी तस्करीचा तेलंगणा पोलिसांनी 'असा' केला पर्दाफाश; वाचा सविस्तर..