सातारा : साताऱ्यात जिल्ह्यात लाचप्रकरण ( Corruption case in satara ) समोर आले आहे. जात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी 50 हजार रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी कराड तहसील कचेरीतील एकावर सांगली लाचलुचपत प्रतिबंधक ( Sangli Anti Corruption Department ) विभागाने कारवाई केली आहे. या आरोपीचे नाव विक्रम वसंत शिवदास (रा. मालखेड, ता. कराड) असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान, गेल्या सहा महिन्यातील ती दुसरी घटना असून लाचखोरीमुळे कराड महसूल विभाग बदनाम झाला आहे.
50 हजार रूपयाची केली मागणी - मिळलेल्या माहितीनुसार, जातप्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी तक्रारदाराच्या भाचीला कुणबी दाखला संबंधित अधिकार्याकडून काढून देतो, असे सांगून 50 हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी तहसील कार्यालयातील लोकसेवक विक्रम वसंत शिवदास याच्यावर सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली, याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वतः करिता आणि संबंधित अधिकार्याकरिता 50 हज़ार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. यापुर्वी कराड शहर तलाठी कार्यालयातील तलाठ्यावर लाच मागितल्याप्रकरणी कारवाई झाली होती.
एसीबीचा कारवाईत धडाका - सातार्यापेक्षा कराडमध्ये एसीबीच्या कारवाईचा धडाका जोरात आहे. मागील सहा महिन्यात वेगवेगळ्या शासकीय कार्यालयातील चार जणांवर लाच मागितल्याप्रकरणी कारवाई झाली आहे. मात्र, लोकसेवकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईचे भय राहिलेले नाही. अधिकारी, कर्मचारी निबर झाले असून नागरीकांची कामे अडवून लाचेची मागणी केली जात आहे. कोणताही लोकसेवक लाच मागत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन अधिकार्यांनी केले आहे.