सातारा - पालिकेतील एका नगरसेवकाने उपमुख्याधिकाऱ्यां समोर आक्षेपार्ह आंदोलन केले. बाळू उर्फ विनोद खंदारे असे या नगरसेवकाचे नाव आहे. ते नगर विकास आघाडी या पक्षाचे आहेत. यामुळे शुक्रवारी एकच गोंधळ झाला. तर पालिका कर्मचाऱ्यांनी खंदारे याच्या कृत्याचा निषेध करत काम बंद आंदोलन करत निदर्शने केली.
वॉर्ड क्रं. 7 मधील शौचालयाच्या कामांचे प्रस्ताव स्थायी समितीच्या अजेंड्यावर घेतले जात नसल्याची नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांची तक्रार होती. सत्ताधाऱ्यांकडून आपले विषय जाणीवपूर्वक अडविले जात असल्याही आरोप त्यांनी केला होता. शुक्रवारी सकाळी पालिकेचे उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांच्या केबिनमध्ये खंदारे यांनी प्रवेश करत आक्षेपार्ह आंदोलन केले. यानंतर धुमाळ यांनी नगरसेवक खंदारे यांची समजूत काढत स्थायी समितीच्या अजेंड्यावर विषय घेण्यात आल्याचा स्पष्ट केले.
हेही वाचा - भाजपने भ्रमात राहू नये, जोपर्यंत शरद पवार निश्चित तोपर्यंत सरकार भक्कम - शिवसेना
कर्मचाऱ्यांचे काम बंद
या प्रकारानंतर पालिकेच्या कर्मचाऱयांनी कामबंद आंदोलन केले. जोपर्यंत दहशतमुक्त वातावरण पालिकेत तयार होत नाही तोपर्यंत कोणीही काम करणार नाही, असे निवेदन कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्ष माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे आणि मुख्याधिकारी शंकर गोरे यांना सादर केले. बाळू खंदारे याची पालिका कर्मचाऱ्यांना नेहमीच दमदाटीची भाषा असते त्यामुळे कर्मचारी तणावात असून कामकाज कालावधीनंतर त्यांना त्यांच्या जिवाची शाश्वती राहिली नाही. त्यांच्यावर तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तर शहरवासियांना मूलभूत हक्कांपासून पालिकेच्या आरोग्य विभागाने वंचित ठेवले आहे. माझ्या प्रभागात नागरिकांना विशेषता महिलांना शौचालयात जाताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वारंवार सांगूनही अधिकारी प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याने मी हे आंदोलन केले. मात्र, अधिकाऱ्यांकडून माझ्या आंदोलनाची वेगळ्या प्रकारची बदनामी करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या काम बंद आंदोलनाचा मी निषेध नोंदवत असून, पुढील काळात देखील मी शहरवासियांच्या न्याय व हक्कांसाठी विविध प्रकारची आंदोलन करत राहणार, असा इशारा नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांनी दिला आहे.