सातारा - कृष्णा रुग्णालयाच्या रोगनिदान प्रयोगशाळेला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून कोविड-19 ची (कोरोना) चाचणी करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे कोरोना चाचण्या आणि त्याचे अहवाल लवकर मिळणे शक्य होणार आहे. सातारा जिल्ह्यातील ही एकमेव प्रयोगशाळा आहे.
कोरोना साथीचा सामना करण्यासाठी कृष्णा रुग्णाल्याने पूर्वीपासूनच पुढाकार घेऊन काम केले आहे. रुग्णालयामध्ये संशयित रूग्ण आणि पॉझिटिव्ह रूग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड, तज्ज्ञ डॉक्टर्स, नर्स, अन्य स्टाफ आणि कोरोनाबाधित रूग्णांची काळजी घेतली आहे. त्यामुळे कृष्णा रुग्णालयात दाखल झालेले रूग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. आत्तापर्यंत कृष्णा रुग्णालयामधून 4 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. त्यामध्ये 10 महिन्याच्या चिमुरड्यासह 78 वर्षीय वृद्धेचाही समावेश आहे.
सातारा जिल्ह्यात ‘कोविड-19’ची चाचणी करण्याची सोय उपलब्ध नसल्याने संशयित रूग्णांचे स्वॅब पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे पाठविले जायचे. या प्रयोगशाळेवर मोठा ताण असल्याने किमान 2 दिवसानंतर रिपोर्ट उपलब्ध होत होते. त्यामुळे कराड येथील कृष्णा रुग्णालयाच्या रोगनिदान प्रयोगशाळेस ‘कोविड-19’ची चाचणी करण्यास मान्यता मिळावी, यासाठी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले सुरवातीपासून आग्रही होते. ‘कोविड-19’च्या चाचण्या येथेच होऊ लागल्यास लवकर निदान होऊन तातडीने योग्य उपचार सुरू करणे शक्य होईल, अशी त्यामागील भूमिका होती. त्यानुसार कृष्णा रुग्णालय प्रशासनाने गेल्या महिन्याभरापासून नवी दिल्ली येथील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेकडे पाठपुरावा केला होता.
कृष्णा रुग्णालयाची रोगनिदान प्रयोगशाळा एन.ए.बी.एल. मानांकित आहे. या ठिकाणी ‘कोविड-19’ ची चाचणी करण्यास आवश्यक ती सर्व अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि तज्ज्ञ स्टाफ आहे. त्यामुळे या प्रयोगशाळेला ‘कोविड-19’ची चाचणी करण्याची परवानगी देत असल्याचे पत्र अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानने रुग्णालयास पाठविले आहे.